बिहारमधील सोनू कुमार नावाच्या एका अकरा वर्षीय मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे. संबंधित मुलाची शिक्षण घेण्यासाठी सुरू असलेली धडपड पाहून अनेकांना हा व्हिडीओ आवडला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार शनिवारी पत्नीच्या पुण्यतिथीनिमित्त नालंदा जिल्ह्यातील कल्याणबिघा येथे आपल्या मूळगावी गेले होते. यावेळी सहावीत शिकणाऱ्या एका अकरा वर्षीय मुलाने मुख्यमंत्र्यांना खासगी शाळेत प्रवेश मिळवून द्यावा, यासाठी हात जोडून विनंती केली.

चिमुकल्याची विनंती ऐकल्यानंतर क्षणभरासाठी नितीश कुमारांना धक्काच बसला. गावातील सरकारी शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याची तक्रार संबंधित मुलानं मुख्यमंत्र्यांकडे केली. तसेच आपल्याला खासगी शाळेत प्रवेश मिळवून द्यावा, अशी विनंतीही त्यानं यावेळी केली. चिमुकल्याची अडचण जाणून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याला खासगी शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

संबंधित मुलानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर म्हटलं की, “नमस्कार सर, मला अभ्यास करायचा आहे. कृपया मला मदत करा. नीमा कौल येथील सरकारी शाळेत चांगलं शिक्षण कसं द्यायचं, हे तेथील शिक्षकांना देखील कळत नाही,” असं म्हणत त्यानं खासगी शाळेत प्रवेश मिळवून देण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली.

११ वर्षीय मुलाचा आत्मविश्वास पाहून मुख्यमंत्री देखील प्रभावित झाले. त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना संबंधित मुलाच्या अभ्यासाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. या घटनेनंतर संबंधित मुलगा सोनू कुमार यानं माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलताना त्यानं सांगितलं की, “त्याचे वडील रणविजय यादव दही विकण्याचं काम करतात. ते जे काही कमावतात किंवा मी जे काही कमावतो, त्या पैशातून वडील दारू पितात. त्यामुळे खासगी शाळेत जाण्यासाठी आपल्याकडे पैसे नाहीत.”