जयपूर : राजस्थानच्या करौली शहरात शनिवारी हिंदू नववर्ष साजरे करण्यासाठी निघालेल्या मोटारसायकल रॅलीदरम्यान धार्मिक संघर्ष उफाळल्यानंतर लागू करण्यात आलेली संचारबंदी रविवारीही कायम होती. या संबंधात १२ हून अधिक लोकांना अटक करण्यात आली असून, या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे.

ही मिरवणूक एका मुस्लीमबहुल वस्तीतून जात असताना त्यावर दगडफेक करण्यात आल्यानंतर शनिवारी दुपारी जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या, अशी माहिती पोलिसांनी दिली. या हिंसाचारात किमान ३५ जण जखमी झाले.  शहरातील मोबाइल इंटरनेट सेवा रविवारीही बंद ठेवण्यात आली. समाजमाध्यमांवर पसरलेल्या हिंसाचाराच्या दृश्यफितींची आपण तपासणी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 ‘या घटनांच्या संबंधात सुमारे ३० जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यापैकी १२ जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनांच्या तपासासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे’, असे करौलीतील तळ ठोकून असलेले पोलीस उपमहानिरीक्षक राहुल प्रकाश यांनी सांगितले.

 या हिंसाचारामुळे राज्यातील सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले आहे. केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार केंद्रात सत्तेवर आल्यानंतर देशात धार्मिक ध्रुवीकरणाचे वातावरणात निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला, याउलट, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांनी या परिस्थितीसाठी काँग्रेसचे ‘तुष्टीकरणाचे राजकारण’ जबाबदार असल्याचा ठपका ठेवला. त्यांनी १० सदस्यांचे एक पथक स्थापन केले असून ते करौलीला जाऊन सर्व संबंधितांशी बोलणार आहे.