Iran-America Talks Update : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धविराम झाल्यानंतर पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये शांतता चर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चेसाठी तिन्ही देशांचं शिष्टमंडळ उपस्थित होतं. मात्र, या चर्चेतून कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. २१ तास चाललेली ही चर्चा निष्फळ ठरली असून कोणताही करार झाला नाही. त्यामुळे अमेरिकचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी.व्हान्स हे लगेचच अमेरिकेला रवाना झाले.

दरम्यान, इस्लामाबादमध्ये २१ तास चाललेल्या या चर्चेत कोणताही करार झाला नसला तरी या चर्चेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे बैठकीतील प्रत्येक क्षणाची अपडेट घेत होते. २१ तास चाललेल्या या बैठकीदरम्यान तब्बल १२ फोन कॉल्सच्या माध्यमातून ट्रम्प यांनी पाकिस्तानात झालेल्या अमेरिका-इराण शांतता चर्चेची माहिती घेतली असल्याची माहिती उपराष्ट्राध्यक्ष जे.डी.व्हान्स यांनी सांगितली आहे.

जेडी व्हान्स यांनी काय माहिती सांगितली?

इस्लामाबादमधील अमेरिका-इराण चर्चेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प हे सतत संपर्कात होते असं जेडी व्हान्स यांनी रविवारी सांगितलं आहे. जेडी व्हान्स म्हणाले की, पाकिस्तानमध्ये इराणच्या नेत्यांसोबत शांतता चर्चेत व्यस्त असताना ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याही सतत संपर्कात होते. ही चर्चा सध्या थांबली आहे. पण आम्ही राष्ट्राध्यक्षांशी सातत्याने बोलत होतो. गेल्या २१ तासांत आम्ही त्यांच्याशी किमान डझनभर वेळा बोललो असू.

दरम्यान, जेडी व्हान्स हे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह संरक्षण सचिव पीट हेगसेथ, परराष्ट्र सचिव मार्को रुबियो, अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट आणि अमेरिकेच्या लष्कराच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख यांच्याशीही ते सतत सल्लामसलत करत होते. जेडी व्हान्स म्हणाले की, “आम्ही सतत संपर्कात होतो, कारण आम्ही प्रामाणिकपणे वाटाघाटी करत होतो. आम्ही येथून एक अतिशय साधा प्रस्ताव, एक सामंजस्य पद्धत घेऊन जात आहोत. जी आमची अंतिम आणि सर्वोत्तम ऑफर असेल.”

अमेरिकेने काय म्हटलं?

जे.डी.व्हान्स यांनी चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना बाजू मांडली. इराणने अमेरिकेच्या अटी मान्य न केल्यामुळे कोणताही करार होऊ शकला नाही, असं त्यांनी सांगितलं. जे.डी.व्हान्स म्हणाले, “आम्ही कोणत्याही करारापर्यंत पोहोचलेलो नाही. त्यांनी आमच्या अटी स्वीकारण्यास नकार दिला. प्रदीर्घ चर्चेनंतर अमेरिकेने आपली अंतिम आणि सर्वोत्तम ऑफर दिली होती आणि संपूर्ण वाटाघाटी दरम्यान अमेरिकेच्या शिष्टमंडळाने बरीच लवचिकता दाखवली होती. जे.डी.व्हान्स यांच्या मते मुख्य मुद्दा इराणच्या अणू कार्यक्रमाचाच आहे. तेहरान अण्वस्त्रे बनवणार नाही, याबाबत त्यांनी स्पष्ट आणि दीर्घकालीन वचनबद्धता द्यावी, अशी वॉशिंग्टनची मागणी आहे. “आम्हाला त्यांच्याकडून केवळ आत्तासाठीच नव्हे तर दीर्घकाळासाठी एक सकारात्मक वचन हवं आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.