रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणआरे आणि कॉन्फिडंट ग्रुपचे चेअरमन डॉ. सी. जे. रॉय यांनी बंगळुरु या ठिकाणी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. ३० जानेवारीला ही बातमी समोर आली. सातत्याने होणाऱ्या प्राप्तीकर खात्याच्या कारवाईमुळे रॉय तणावग्रस्त झाले होते. त्याच तणावातून रॉय यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. रॉय त्यांच्या घरी होते, त्यावेळी त्यांच्या कार्यालयावर आयटीची धाड पडली. ज्यानंतर त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं. आता रॉय यांची मालमत्ता आणि त्यांच्याकडे असलेल्या लक्झरी कार यांची माहिती समोर आली आहे.
१२ रोल्स रॉईस कार, फेरारी आणि बऱ्याच कार त्यांच्या कलेक्शनमध्ये
सी. जे. रॉय हे त्यांच्या कार प्रेमामुळे कायमच चर्चेत असत. वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी पहिलं वाहन घेतल्याची पोस्ट त्यांनी केली होती. तर गेल्या वर्षी जुलै महिन्यात त्यांनी नवी कार घेतल्याचे फोटो पोस्ट केले होते. त्यांच्याकडे १२ रोल्स रॉईस कार आहेत. तर २००५ मध्ये त्यांनी लिमोझीन ही कार विकत घेतली होती.
डॉ. रॉय यांचं कार प्रेम सर्वश्रुत होतं
रॉय यांनी मागच्या अनेक वर्षांत अनेक उंची आणि आलिशान कार विकत घेतल्या. रोल्स रॉईस, लँबॉर्गिनी, बुगाटी व्हेरॉन अशा सगळ्या गाड्या त्यांच्या गॅरेजमध्ये उभ्या आहेत. नोव्हेंबर २०२५ मध्ये रॉय यांनी १२ कोटी रुपयांची रोल्ल रॉईस फँटम ही कार विकत घेतली होती. ही त्यांची बारावी कार ठरली. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर त्यांनी ही माहिती दिली होती. तसंच त्यांनी पहिली रोल्स रॉईस कार २००८ मध्ये घेतल्याचंही म्हटलं होतं. जुलै २०२५ मध्ये त्यांनी निळ्या रंगाची फेरारी कारही विकत घेतली होती. पैशांनी तुम्ही काहीही विकत घेऊ शकता पण तुम्हाला साधेपणा विकत घेता नाही, फेरारी कार हवाई चप्पल घालून तुम्ही चालवू शकता अशी कॅप्शन त्यांनी लिहिली होती. जी लक्षवेधी ठरली होती.
इन्स्टाग्रामवर रॉय यांचे अनेक फॉलोअर्स
एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्यांनी दुबई या ठिकाणी त्यांच्या कारचं जे कलेक्शन होतं त्याचा व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओत बुगाटी, लँबॉर्गिनी, बेंटले, रोल्स रॉईस अशा अनेक उंची कार दिसल्या. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फॉलोअर्स होते. दरम्यान त्यांच्या आत्महत्येचा तपास बंगळुरु पोलीस करत आहेत. तपासात ही आत्महत्या आहे हे समोर आलं आहे आम्ही पुढील तपास करत आहोत अशी माहिती बंगळुरु पोलीस विभागाचे प्रमुख सीमांत कुमार यांनी म्हटलं आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

