पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान रस्त्यावरचे दिवे बंद अर्धवट सुरू किंवा बंद असल्यामुळे बडोदा जिल्ह्यातल्या दाभोई नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. ३१ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान या ठिकाणी आले होते. १२ पथदिवे नीट स्थितीत सुरू नव्हते तर काही बंदच होते.
महापालिका आयुक्तांनी लायटिंग डिपार्टमेंटचे महेश वसावा यांना निलंबनाची नोटीस बजावली आहे. व्हीआयपींचा दौरा असताना पथदिवे नीट स्थितीत नसल्याचं कारण देत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
सहा दिवसांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर हजर होऊन याप्रकरणी स्पष्टीकरण द्यावे असे आदेश देण्यात आले आहेत.
गुजरात म्युनिसिपॅलिटी अॅक्ट १९६३च्या अन्वये ३१ ऑक्टोबर रोजी निलंबनाचा आदेश काढण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि बाकी नेते ३१ ऑक्टोबर रोजी एकता नगर इथे आयोजित राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमानंतर हेलिकॉप्टरने बडोद्याला जाणार होते. मात्र संध्याकाळ झाल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान आणि अन्य नेते रस्ते मार्गाने बडोदा इथे पोहोचले. ९० किमी एवढं अंतर होतं.
दाभोई नगरपालिकेचे मुख्य अधिकारी विराज शहा यांनी निलंबनाचा आदेश जारी केला. पंतप्रधानांचा व्हीआयपी दौरा असल्यामुळे प्रशासनाने संबंधित विभागांना रस्ते स्वच्छ ठेवणे, भटक्या प्राण्यांना नियंत्रित करणे, पथदिवे सुस्थितीत असणे याबाबत सूचना दिल्या होत्या.
लायटिंग डिपार्टमेंचे वसावा यांच्याकडे ही जबाबदारी होती. मात्र पंतप्रधानांचा कॉन्व्हॉय जात असताना पथदिवे नीट सुरू नसल्याचं तसंच काही बंद असल्याचं दिसलं. सूचना देऊनही पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि बाकी नेते या भागातून जात असताना पथदिवे योग्य स्थितीत असतील याची खातरजमा तुम्ही करायला हवी होती. त्यासाठी आवश्यक दुरुस्ती देखभाल करायला हवी होती. यापैकी काहीही झालं नाही त्यामुळेच पथदिवे अर्धवट सुरू असल्याचं स्पष्ट झालं. यासाठी तुमच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे असं आदेशात म्हटलं आहे.
एकतानगरहून बडोद्याला जाणारा हायवे दाभोई शहराच्या जवळून जातो. अनेक महत्त्वाचे रस्ते इथे एकवटतात. सिनोर क्रॉसरोड ते सरिता ब्रिज हा टप्पा भोगल परिसरात मोडतो. इथले पथदिवे सुरू नसल्याचं उघड झालं. पथदिव्यांची ही अवस्था का आहे याचं स्पष्टीकरण त्यांना सहा दिवसांनंतर द्यायचं आहे.
