तेलंगणातील हनुमाकोंडा जिल्ह्यातील दोन गावांमध्ये जवळपास ३०० भटक्या श्वानांना विषारी इंजेक्शन देऊन ठार मारण्यात आल्याची घटना घडली आहे. ६ ते ८ जानेवारी दरम्यान हा प्रकार घडला. भटक्या श्वानांच्या खाद्यपदार्थात देखील विष कालवण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी दोन सरपंच तसेच त्यांचे पती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण नऊ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. शयमपेट व अरेपल्ली या दोन गावांच्या ग्रामपंचायत हद्दीत ही घटना घडली आहे.

हनुमाकोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३०० भटक्या श्वानांचे मृतदेह शयमपेट व अरेपल्ली या दोन ग्रामपंचायत हद्दीत आढळून आले. दोन्ही गावात जवळपास ३०० भटके श्वान मृत अवस्थेत आढळून आले आहेत. त्यांना विषारी इंजेक्शन तसेच विषारी खाद्यपदार्थ देण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० नुसार गुन्हे दाखल केले आहेत.

भटक्या जनावरांसाठी काम करणाऱ्या ‘स्ट्रे अॅनिमल फाउंडेशन ऑफ इंडिया’ या एनजीओजने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. भटक्या श्वानांना विषारी इंजेक्शन तसेच विषारी खाद्यपदार्थ देणाऱ्या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सरकारने भटक्या श्वानांची नसबंदी तसेच लसीकरण करण्याची आवश्यकता आहे. तसेच सरकारने भटक्या श्वानांशी नागरिकांची वागणूक कशी असावी याबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे तक्रारीत नमूद आहे. हनुमाकोंडा जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, श्वानांना विषारी इंजेक्शन तसेच त्यांच्या खाद्यपदार्थांमध्ये विष कालवण्यात आले होते.

भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (१३ जानेवारी) गंभीर चिंता व्यक्त केली. भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्यास किंवा कुत्र्याच्या हल्ल्यात लहान मुलांचा किंवा वृद्धांचा मृत्यू झाल्यास किंवा ते जखमी झाल्यास राज्य सरकारला मोठी नुकसान भरपाई द्यावी लागेल, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान केली.

राज्य सरकारला मोठी नुकसान भरपाई द्यावी लागेल

न्यायाधीश विक्रम नाथ म्हणाले, “भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे एखाद्या मुलाचा किंवा वृद्धाचा मृत्यू झाल्यास राज्य सरकारला मोठी नुकसान भरपाई द्यावी लागेल. कारण राज्य सरकारने उपाययोजना न केल्यामुळे भटक्य कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे. तसेच भटक्या कुत्र्यांना अन्न भरविणाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित केली जाईल. जर त्यांना भटक्या कुत्र्यांची काळजी असेल तर त्यांनी कुत्र्यांना आपल्या घरी घेऊन जावे. त्यांना रस्त्यावर लोकांना घाबरविण्यासाठी आणि चावा घेण्यासाठी सोडले आहे का?”