पीटीआय, नवी दिल्ली
देशातील हवाई वाहतूक नियंत्रकांच्या मंजूर ५ हजार ५३७ पदांपैकी १ हजार २७९ पदे सध्या रिक्त असल्याची माहिती केंद्र सरकारने गुरुवारी दिली. देशातील हवाई वाहतुकीचे व्यवस्थापन हे केंद्र सरकारच्या मालकीच्या भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) कडून केले जाते. तसेच देशातील हवाई नेव्हिगेशन सेवा पुरवणारी हवाई मार्गदर्शन सेवा प्रदाता (एएनएसपी) ही एकमेव संस्था एएआय आहे.
‘हवाई वाहतूक व्यवस्थापन एएआयकडून एकूण ५ हजार ५३७ मंजूर हवाई वाहतूक नियंत्रकांच्या पदांच्या आधारे केले जाते. त्यापैकी १ हजार २७९ पदे रिक्त आहेत,’ अशी माहिती नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेत दिली. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत देशातील सात कार्यरत प्रशिक्षण केंद्रांमध्ये ४ हजार ३२० एटीसी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.
हवाई वाहतूक नियंत्रकांची नेमणूक नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या ‘वॉच ड्युटी टाइम लिमिटेशन्स’संबंधी नागरी विमान वाहतूक आवश्यकता नियमांनुसार केली जाते. हे नियम आंतरराष्ट्रीय मानकांनुसार असून विमानतळांवरील हवाई वाहतुकीच्या प्रमाणानुसारही नियोजन केले जाते, जेणेकरून सुरक्षित आणि कार्यक्षम हवाई वाहतूक व्यवस्थापन सुनिश्चित करता येईल, असे मंत्री म्हणाले. ‘सद्य:स्थितीतील नियम व मानकांनुसार उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर करून विमान सुरक्षेची खात्री केली जाते. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे कोणतेही महत्त्वाचे कार्यकारी युनिट बंद करण्यात आलेले नाही,’ असे मोहोळ यांनी लेखी उत्तरात नमूद केले.
