अवघ्या पंधरा वर्षांंच्या मुलाने सूर्यमालेपासून दूर असलेला एक ग्रह शोधून काढला आहे. वेधशाळेच्या माहितीचा अभ्यास करीत असताना त्याला या ग्रहाचा शोध लागला आहे. टॉम वॉग असे या मुलाचे नाव असून, तो स्टॅफर्डशायरमधील किली विद्यापीठात शिकतो. दक्षिण आफ्रिकेतील कॅमेऱ्यांनी टिपलेली आकाशगंगेतील ताऱ्यांची माहिती अभ्यासत असताना त्याला हा शोध लागला.ग्रह शोधून काढणारा टॉम हा सर्वात लहान मुलगा असून, तो बारावीत आहे. त्याला या ग्रहास रीतसर नाव देण्याची इच्छा आहे व पुढचे शिक्षण तो भौतिकशास्त्रातच  घेणार आहे.
दोन वर्षे निरीक्षण केल्यानंतर विद्यापीठातील वैज्ञानिकांनीही  टॉमने खरोखर नवा ग्रह शोधल्याच्या दाव्याला दुजोरा दिला. हा ग्रह पृथ्वीपासून एक हजार प्रकाशवर्षे दूर आहे, त्याचा कॅटलॉग नंबर ‘वास्प १४२ बी’ असा असून तो आता वास्प प्रकल्पात शोधलेला १४२ वा ग्रह आहे.
वास्प म्हणजे ‘वाइड अँगल सर्च फॉर प्लॅनेट’ नावाचा पाहणी प्रकल्प असून त्यात रात्रीच्या आकाशाचे निरीक्षण केले जाते. त्यात लाखो तारे दिसतात. या ताऱ्यांचे निरीक्षण करीत असताना मातृताऱ्यासमोरून जाणारे ग्रह दिसत असतात. ते स्पष्ट दिसत नाहीत पण ते ताऱ्याच्या गुरूत्वावरून ओळखता येतात.
टॉमने सांगितले की, नवीन ग्रह शोधल्याचा आपल्याला आनंद झाला. न्यू कासल येथील लाइम स्कूलचा विद्यार्थी असलेल्या टॉमला विद्यार्थी दशेतच विज्ञानची गोडी लागली असून, किली विद्यापीठात बाह्य़ ग्रहांचा शोध घेण्याचे काम चालते व त्यासाठी एक संशोधन गटही स्थापन करण्यात आला आहे. त्यामुळे टॉमला या गटात सामील करून घेण्यात आले. सापडलेला ग्रह तप्त गुरूसारखा असून, हॉट ज्युपिटर गटात तो मोडतो. आपल्या सूर्यमालेत तसा एकही ग्रह नाही. त्याच्या कक्षा ताऱ्याच्या निकट असल्याने तो तप्त आहे. त्या ताऱ्याभोवती टॉमने शोधलेल्या ग्रहांसारखे आणखी ग्रह असतील असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे.