उत्तराखंडमधील डेहराडूनमध्ये एका २३ वर्षाच्या तरुणीने स्वतःच्या राहत्या घरी आत्महत्या केली. आई, बाबा तुमच्यावर माझं मनापासून प्रेम आहे, अशा आशयाची चिठ्ठी तिने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवली होती. रिया कुमार थापा असं या मुलीचं नाव आहे. रिया कारगील युद्धात लढलेल्या माजी सैनिकाची मुलगी होती. नेहमीप्रमाणे मंगळवारीदेखील तिची आई सकाळी नाश्ता करण्यासाठी तिला उठवायला गेली. आईने दार वाजवले, परंतु तिच्या खोलीतून काहीच प्रतिसाद आला नाही. थोड्या वेळाने पुन्हा जेव्हा दार वाजवले तेव्हाही तिने दार उघडले नाही.
दार तोडले तेव्हा आत मृतदेह लटकत होता
मुलीच्या खोलीचं दार तिच्या वडिलांनी जेव्हा तोडले तेव्हा त्यांना आतमध्ये तिचा लटकणारा मृतदेह दिसला. काही वेळाने तिच्या खोलीतून एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीमध्ये तिने “आई-बाबा, मी तुमच्यावर खूप प्रेम करते. यात कोणाचीच काही एक चूक नाही.” असे हिंदीमध्ये लिहिले होते.तिच्या आईवडिलांनी या घटनेनंतर थेट जवळच्या पटेल नगर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली.
बारावीत पहिला नंबर आलेल्या रियाने आत्महत्या केल्याने हळहळ
रिया थापा २१ जून रोजी होणाऱ्या नीट परीक्षेची तयारी करत होती. ती रात्रभर जागून अभ्यास करायची, असे वरीष्ठ पोलीस अधिकारी अंकित कंदारी यांनी ए एन आय या वृत्तसंस्थेला याविषयी माहिती दिली. ते पुढे म्हणाले, “या चिठ्ठीमध्ये त्या मुलीने तिच्या वडिलां विषयी प्रेम व्यक्त केले आहे. तसेच तिने तिच्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये असेही म्हटले आहे. हा निर्णय तिने, परीक्षेची तयारी झाली नव्हती, याचा तिला ताण आला होता. त्याच दबावाखाली येऊनच तिने हे इतक्या टोकाचे पाऊल उचलले. रिया थापा ही मुलगी वास्तविक पाहता प्रचंड हुशार होती. बारावीत तिने शाळेत पहिली नंबर काढला होता. तिने ९६.७ टक्के मिळवले होते. आता ती २१ जून रोजी होणाऱ्या (युजी-नीट) फेरपरीक्षेची तयारी करत होती. याआधी जेव्हा तिने तिच्या वैद्यकीय परीक्षेसाठी प्रयत्न केला तेव्हा ती अनुत्तीर्ण झाली होती अशी माहिती मिळाली आहे.
रियाच्या पालकांनी दिलेल्या माहितीबाबत पोलीस काय म्हणाले?
कंदारी यांनी पुढे असेही सांगितले की, “तिच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींकडून आम्हाला जी माहिती मिळाली, विशेषकरून तिच्या पालकांकडून जी माहिती मिळाली त्यानुसार ती तिचा जास्तीत जास्त वेळ अभ्यासात घालवायची. आम्हाला ती नैराश्यातून जात आहे असे कधीही जाणवले नाही. तिच्या वागणे बोलणेदेखील अगदी साधेसरळ होते, म्हणूनच ती आत्महत्या करू शकेल यावर अजून आमचा विश्वास बसलेला नाही.” या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
