एपी, मॉस्को

मध्य रशियातील एका शाळेत माथेफिरूने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात सोमवारी सात विद्यार्थ्यांसह १३ नागरिक ठार, तर २१ जखमी झाले. 

पोलिसांच्या तपास पथकाने हल्लेखोराची ओळख पटवली असून त्याचे नाव आर्टिओम काझांतसेव्ह असे आहे. तो त्याच शाळेचा माजी विद्यार्थी आहे. त्याने हल्ल्याच्या वेळी ‘नाझी’ राजवटीचे बोधचिन्ह असलेला काळा टी-शर्ट परिधान केला होता. हल्लेखोराची अधिक माहिती आणि हल्ल्यामागचा त्याचा हेतू अद्याप समजू शकलेला नाही. रशियाचा मध्य प्रांत उदमुर्तिआची राजधानी इझेव्हस्क येथील एका शाळेत घडलेल्या या घटनेची माहिती पोलिसांच्या तपास पथकाने निवेदनाद्वारे दिली. गोळीबारात जखमी झालेल्यांमध्ये १४ विद्यार्थी आणि सात नागरिकांचा समावेश असल्याचे त्यात म्हटले आहे.  उदमुर्तिआचे गव्हर्नर अलेक्झांडर ब्रेचालोव्ह यांनी एक ध्वनिचित्रफीत प्रसृत केली असून त्यात अज्ञात हल्लेखोराने हल्ल्यानंतर गोळी झाडून आत्महत्या केली, असे म्हटले आहे. हल्लेखोर मनोरुग्ण होता आणि त्याने उपचारासाठी एका मानसोपचार रुग्णालयात नाव नोंदवले होते, अशी माहितीही ब्रेचालोव्ह यांनी दिली. हल्ल्यातील १३ मृतांमध्ये नऊ विद्यार्थी असल्याचे ब्रेचालोव्ह यांनी सांगितले असले तरी रशियाच्या तपास पथकाच्या माहितीनुसार मृत विद्यार्थ्यांची संख्या सात आहे.

या शाळेत पहिली ते अकरावीपर्यंतचे वर्ग आहेत. हल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलवून शाळा रिकामी करण्यात आली. तसेच संपूर्ण शाळा परिसराची नाकाबंदी करण्यात आली. इझेव्हस्कची लोकसंख्या सहा लाख ४० हजार आहे. रशियाची राजधानी मॉस्कोपासून हे शहर सुमारे ९६० किलोमीटरवर पूर्वेला आणि उरल पर्वतराजीच्या पश्चिमेला वसलेले आहे.

‘दहशतवादी कृत्य’ रशिया सरकारचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी या घटनेचे वर्णन ‘‘दहशतवादी कृत्य’’ असे केले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी विद्यार्थी आणि नागरिकांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आणि संबंधित अधिकाऱ्यांना हल्ल्याच्या तपासाचे आदेश दिले, असेही पेस्कोव्ह यांनी सांगितले.