वृत्तसंस्था, गाझा, जेरुसलेम

‘हमास’च्या अतिरेक्यांनी इस्रायलवर हल्ला केल्यानंतर ओलिस धरलेल्या १३ इस्रायलींची शुक्रवारी सुटका केल्याची माहिती इस्रायलच्या माध्यमांनी दिली. इस्रायल आणि हमासदरम्यान झालेल्या शस्त्रविरामाच्या करारानुसार, हमास २४०पैकी ५० ओलिसांची टप्प्याटप्प्याने सुटका करणार आहे. त्यानंतर इस्रायलकडून पॅलेस्टिनी १५० कैद्यांची सुटका केली जाणार आहे. दोन्ही बाजूंनी चार दिवसांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने ओलिसांची आणि कैद्यांची सुटका केली जाणार आहे. याबरोबरच ‘हमास’ने १२ थाई ओलिसांचीही सुटका केल्याची माहिती थायलंडच्या पंतप्रधानांनी दिली.

इस्रायल आणि हमासदरम्यानच्या युद्धामध्ये चार दिवसांच्या विरामाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. त्यामुळे गाझा पट्टीत अत्यावश्यक मदत सामग्री पोहोचवणे शक्य होणार आहे, तसेच हमासच्या ताब्यातील ओलीस आणि इस्रायलच्या ताब्यातील पॅलेस्टिनी कैदी यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.शुक्रवारी सकाळपासून विरामाची अंमलबजावणी सुरू झाली. त्यानंतर कोणताही हवाई हल्ला किंवा धुमश्चक्री झाली नाही. चार दिवस युद्ध थांबवण्याच्या समझोत्यामुळे तब्बल ४८ दिवसांनंतर गाझामधील २३ लाख लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दीड महिन्यांपेक्षा जास्त काळ त्यांना इस्रायलचे हवाई हल्ले आणि जीवनावश्यक गोष्टींचा आटत जाणारा पुरवठा या संकटांचा सामना करावा लागला. त्यापासून काही काळ त्यांची सुटका होण्याची आशा निर्माण झाली आहे. दुसरीकडे, हमासमधील ओलिसांच्या सुरक्षिततेबद्दल त्यांच्या कुटुंबीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

शस्त्रविरामामुळे, युद्धाची तीव्रता कमी होण्याची आशा वाढली आहे. या युद्धात गाझा पट्टीतील निवासी इमारती, रुग्णालये आणि इतर आस्थापने उद्ध्वस्त झाली, इस्रायलच्या ताब्यात असलेल्या पश्चिम किनारपट्टीत हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आणि युद्धाची व्याप्ती पश्चिम आशियामध्ये वाढण्याची भीती निर्माण झाली. दुसरीकडे, विरामाची मुदत संपल्यानंतर युद्ध पुन्हा सुरू होईल असे इस्रायलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. इस्रायली फौजांनी दक्षिण गाझामध्ये पत्रके टाकून लाखो पॅलेस्टिनी विस्थापितांना उत्तर गाझामधील युद्धभूमीकडे परत जाऊ नये असे सांगितले. मात्र, शेकडो पॅलेस्टिनी उत्तरेकडे जाताना दिसले. इस्रायली फौजांनी त्यांच्यावर गोळीबार केला, त्यामध्ये दोघे ठार झाले आणि अन्य ११ जखमी झाले.

हेही वाचा >>>संजय राऊतांच्या हिटलर संदर्भातील पोस्टचा इस्रायलकडून कठोर शब्दांत निषेध; या प्रकरणी राऊतांची प्रतिक्रिया…

शस्त्रविरामाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर काही वेळातच इंधनाचे चार टँकर आणि स्वयंपाकाच्या गॅसचे चार टँकर इजिप्तमधून गाझा पट्टीत शिरले. इस्रायलने विरामाच्या कालावधीत दररोज एक लाख ३० हजार लिटर इंधन गाझा पट्टीत पोहोचवण्याची परवानगी दिली आहे. तेथील दैनंदिन गरज १० लाख लिटरपेक्षाही जास्त आहे. गाझामध्ये मानवतावादी संकट टाळण्यासाठी इंधनाची तातडीची गरज असल्याचे संयुक्त राष्ट्रांतर्फे सांगण्यात आले.दोन्ही पक्षांदरम्यान झालेल्या समझोत्यानुसार, हमास आपल्या ताब्यातील २४०पैकी ५० ओलिसांची सुटका करणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने लहान मुले व महिलांचा समावेश असेल. तर इस्रायल १५० पॅलेस्टिनी कैद्यांना सोडणार आहे. या सर्वाची सुटका टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. त्याशिवाय हमासने केलेल्या अतिरिक्त १० ओलिसांच्या सुटकेसाठी शस्त्रविरामाचा एक दिवस वाढवला जाईल असा प्रस्ताव इस्रायलकडून ठेवण्यात आला आहे.