राज्यात कोळशाअभावी १३ वीजनिर्मिती संच बंद; तूट भरून काढण्याचे आव्हान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशभरात कोळसाटंचाई निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून औष्णिक वीजनिर्मिती हळूहळू कमी होत आहे. त्यातच महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील १३ संच कोळशाअभावी सध्या बंद पडले आहेत. यात महानिर्मितीचे चंद्रपूर, भुसावळ व नाशिक हे प्रत्येकी २१० मेगावॉटचे तसेच पारस- २५० मेगावॉट आणि भुसावळ व चंद्रपूर येथील ५०० मेगावॉटचा प्रत्येकी एक संच बंद झाला आहे. यासोबतच कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडचे (गुजरात) ६४० मेगावॉटचे चार संच आणि रतन इंडिया पॉवर लिमिटेडचे (अमरावती) ८१० मेगावॉटचे तीन संच बंद आहेत. यामुळे महावितरणला औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमधून कराराप्रमाणे मिळणाऱ्या विजेमध्ये घट होत आहे.

विजेची मागणी व उपलब्धता यामधील सध्या ३३३० मेगावॉटची तूट भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून (पॉवर एक्सचेंज) वीज खरेदी सुरू आहे. देशभरात विजेची मागणी वाढल्यामुळे वीज दर महाग होत आहे. खुल्या बाजारातून ७०० मेगावॉट विजेची खरेदी १३ रुपये ६० पैसे प्रतियुनिट दराने करण्यात येत आहे. रविवारी सकाळी ९०० मेगावॅट विजेची ६ रुपये २३ पैसे प्रतियुनिट दराने खरेदी करण्यात आली. यासोबतच कोयना धरण तसेच इतर लघु जलविद्युत निर्मिती केंद्र आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोतांद्वारे वीज उपलब्ध करण्यात येत आहे.

कोळसा टंचाईचे सावट गडद होत असतानाच राज्यात उष्मा वाढल्यामुळे विजेची मागणीही वाढली आहे. राज्यात शनिवारी १७,२८९ मेगावॉट विजेच्या मागणीप्रमाणे महावितरणकडून पुरवठा करण्यात आला. गेल्या २४ तासांमध्ये राज्याच्या काही भागांत पाऊस झाल्यामुळे रविवारी विजेच्या मागणीत घट झाली. रविवारी सकाळी ११.३० वाजता राज्यात १८,२०० मेगावॉट, तर महावितरणच्या कार्यक्षेत्रात १५ हजार ८०० मेगावॉट विजेची मागणी होती. विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार कृषीवाहिन्यांवर दररोज ८ तास दिवसा किंवा रात्री चक्राकार पद्धतीने थ्री फेज वीजपुरवठा करण्यात येत आहे.

वीजवापर काटकसरीने करण्याचे आवाहन

’कोळसा टंचाईमुळे विजेचा तुटवडा

वाढण्याची शक्यता अधिक असल्याने मागणी व पुरवठा यात समतोल ठेवण्याचे महावितरणचे प्रयत्न आहेत.

’वीजग्राहकांनी सकाळी ६ ते १० आणि

सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेदरम्यान विजेचा वापर अतिशय काटकसरीने करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

’विजेची सर्वाधिक मागणी असणाऱ्या कालावधीत विजेचा वापर कमी झाल्यास मागणी व उपलब्धता यातील तूट कमी होईल व भारनियमन करण्याची गरज भासणार नाही.

दिल्ली सरकार – केंद्र  यांच्यात कलगीतुरा

वीजटंचाईच्या मुद्द्यावरून दिल्ली सरकार अणि केंद्र सरकार यांच्यात रविवारी कलगीतुरा रंगला. वीजटंचाईमुळे दिल्ली अंधारात जाण्याची भीती असून, केंद्र सरकार या प्रश्नाकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी केला. त्यावर दिल्लीला पुरेसा वीजपुरवठा होत असून, अनावश्यक भीती निर्माण करण्यात येत असल्याचे प्रत्युत्तर केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी दिले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 13 power plants shut down in the state due to lack of coal loss of weight regulation akp
First published on: 11-10-2021 at 01:25 IST