Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईमध्ये १४ माओवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. छत्तीसगडच्या सुकमा आणि बिजापूर जिल्ह्यात शनिवारी सकाळी सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन ठिकाणी वेगवेगळी कारवाई केली. या दोन्ही ठिकाणच्या कारवाईत एकूण १४ माओवादी ठार झाले आहेत.
तसेच सुरक्षा दलांकडून अद्यापही शोध मोहीम सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या चकमकीत ठार झालेल्या माओवाद्यांमध्ये ८ लाख रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी कमांडर मंगडू याचाही समावेश आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माओवाद संपवण्यासाठी मार्च २०२६ ची अंतिम मुदत दिलेली आहे. त्या पार्श्नभूमीवर सुरक्षा दलाकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
सुकमाच्या जंगलात कारवाई
पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सुकमा जिल्ह्याच्या दक्षिणेकडील एका जंगलात सुरक्षा दलांचं एक संयुक्त पथक ही कारवाई करत होतं. पहाटेपासून गोळीबार सुरू झाला होता आणि तो अधून-मधून सुरूच होता. या कारवाईनंतर घटनास्थळावरून अनेक मृतदेह सापडले आहेत. तसेच हे ऑपरेशन अद्याप संपलेलं नसून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
बिजापूरमध्येही चकमक
छत्तीसगडच्या बिजापूरमध्येही सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झाले आहेत. या भागात सशस्त्र माओवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान अचानक सुरक्षा दल आणि माओवादी यांच्यात चकमक सुरू झाली आणि झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झाले आहेत.
शोध मोहीम अद्यापही सुरूच
सुकमा पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सुरक्षा दलांचे एक पथक जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भागातील जंगलात अद्यापही कारवाई करत आहे. हे ऑपरेशन अद्याप संपलेलं नसून संपूर्ण परिसरात कसून शोधमोहीम राबवण्यात येत आहे.
