लैंगिक अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कर्नाटकातील हसनचा माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याच्याशी संबंधित एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेंगळुरू येथील मध्यवर्ती कारागृहात असलेल्या प्रज्वल रेवन्नाच्या बॅरकमधून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोन आणि पेनड्राईव्हच्या फोरेन्सिक तपासातून अत्यंत खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे.

कारागृहातील उच्च सुरक्षा कक्षात असूनही रेवण्णाकडे स्मार्टफोन, सिमकार्ड, चार्जर आणि पेनड्राईव्ह सहज उपलब्ध होते. फोरेन्सिक अहवालानुसार, या मोबाईल फोनमध्ये १४५ हून अधिक अश्लील (पॉर्न) व्हिडिओ क्लिप्स, ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवरील वेब सीरिज आणि चित्रपट मिळून आले आहेत. याशिवाय पेनड्राईव्हमध्येही १०० पेक्षा जास्त व्हिडिओ क्लिप्स आढळून आल्या आहेत.

तुरुंगातून बाहेरील लोकांशी संपर्क; नातेवाईक अन् महिला मित्राशी संभाषण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्वल रेवण्णा या फोनचा वापर केवळ मनोरंजनासाठीच नाही, तर कारागृहाबाहेर अनधिकृतपणे संपर्क साधण्यासाठीही करत होता. फोनच्या कॉल डिटेल्स रेकॉर्डवरून (CDR) असे स्पष्ट झाले आहे की, मध्यस्थांच्या मदतीने त्याने आपल्या कौटुंबिक सदस्यांशी तसेच एका महिला मित्राशी थेट संवाद साधला होता.

बॅरकच्या झाडाझडतीत पोलिसांना एक वही (नोटबुक) देखील सापडली असून, त्यामध्ये कौटुंबिक सदस्य आणि महिला मित्राचे ६ ते ७ संपर्क क्रमांक लिहून ठेवण्यात आले होते. चौकशीदरम्यान रेवन्नाने फोन स्वतःचा नसल्याचा दावा केला असून, तो बॅरकमधील इतर कैद्यांमध्ये फिरता (रोटेशनल बेसिसवर) वापरला जात असल्याचे सांगितले. मात्र, ती वही आपलीच असल्याची कबुली त्याने दिली आहे.

कारागृहातील रॅकेट उघड; २ लाखांपर्यंत विकले जायचे मोबाईल

मध्यवर्ती गुन्हे शाखेने (CCB) ११ ऑगस्ट रोजी केलेल्या अचानक पाहणीदरम्यान हा सर्व प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी परप्पना अग्रहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी आतापर्यंत ५ जणांना अटक केली आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार:

  • तुरुंग कर्मचाऱ्यांची साथ: एका तुरुंग रक्षकाने (वार्डल) मोबाईल फोन आत पोहोचवण्यास मदत केली, तर एका अंडरट्रायल कैद्याने तोंडात लपवून सिमकार्ड आत आणले होते.
  • लाखोंची लाच: तुरुंगात जवळपास १० हजार रुपयांचा मोबाईल ७५ हजार ते २ लाख रुपयांपर्यंत कैद्यांना विकला जात होता.
  • मार्च महिन्यापासून सक्रिय: रेवन्ना वापरत असलेले सिमकार्ड आंध्र प्रदेशातील असून ते मार्च महिन्यापासून सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणात पोलीस आता त्या सर्व व्यक्तींना नोटिसा बजावणार आहेत, ज्यांच्याशी या मोबाईलवरून संपर्क साधण्यात आला होता. या घटनेमुळे व्हीआयपी कैद्यांना मिळणाऱ्या अवाजवी सुविधा आणि तुरुंग प्रशासनाच्या सुरक्षेतील गंभीर त्रुटींवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.