श्रीनगर : दक्षिण काश्मीरमधील पवित्र अमरनाथ गुंफेच्या पायथ्याशी असलेल्या यात्रातळानजीक शुक्रवारी ढगफुटी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यात १५ जणांचा मृत्यूू झाला असून ४० जण बेपत्ता आहेत.

अमरनाथ गुंफेच्या परिसरात सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही ढगफुटी झाली. प्रचंड पावसात या तळावरील काही तंबू, प्रसादालयांचे नुकसान झाले असून तेथे बचाव मदतकार्य सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. राष्ट्रीय आपत्ती निवार दल, राज्य आपत्ती  निवारण दलाचे जवान तसेच  पोलीस आणि नागरी प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी या कामात सहभागी झाले आहेत. इंडोतिबेटियन सीमा पोलिसांचे जवानही मदतकार्यात सहभागी झाले आहेत. सायंकाळी प्रथम हे वृत्त मिळाले, तोवर  दोन जणांचा मृत्यू झाला होता.

एएनआयने दिलेल्या बातमीनुसार, ढगफुटीच्या या घटनेत काही जणांचा मृत्यू झाला असावा, पण त्याबाबत आताच निश्चित असे काही सांगता येत नाही,  अशी माहिती इंडोतिबेटियन पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पाहा व्हिडीओ –

काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजयकुमार यांनी प्राथमिक माहिती देताना म्हटले होते की, ढगफुटीमुळे गुंफेच्या पायथ्यानजीकच्या यात्रातळावरील काही लंगर आणि तंबू यांचे नुकसान झाले आहे.   

रात्री मिळालेल्या वृत्तानुसार, मृतांची संख्या पंधरावर पोहोचली होती. पहलगाम  पोलीस नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले की,  मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

(छायाचित्र सौजन्य- एएनआय)