मोठ्या भावावर लोखंडी रॉडने वार करुन १५ वर्षांच्या मुलाने त्याला संपवलं आणि त्यानंतर गरोदर वहिनीवर बलात्कार केला. एवढंच नाही तर गरोदर वहिनीचीही हत्या त्याने केली. ही घटना गुजरातच्या जुनागढ शहरापासून ५० किमी अंतरावर असलेल्या एका गावात घडली आहे. १५ वर्षांच्या मुलाने दिलेल्या कबुलीनंतर सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
नेमकी घटना काय घडली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना १६ ऑक्टोबरला घडली. शुक्रवारी मृतदेह सापडल्यानंतर संपूर्ण घटना उघडकीस आली. बिहारमध्ये राहणाऱ्या मृत महिलेच्या पालकांनी विसावदर पोलिसांशी संपर्क साधला तेव्हा हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आला. आतापर्यंतच्या तपासात असे दिसून आले आहे की आरोपी मुलगा एका डेअरीमध्ये काम करत होता. तो त्याच्या मोठ्या भावावर खूप रागावला होता, त्याचा भाऊ त्याला मारहाण करत होता आणि त्याचे पैसे हिसकावून घेत होता असं कथित रागाचं कारण सांगितल्याची माहिती आहे. आरोपीने पोलिसांसमोर हे मान्य केलं आहे की त्याने त्याच्या भावाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केले आणि तो मरेपर्यंत त्याच्यावर तो वार करत राहिला.
गरोदर वहिनीवर बलात्कार आणि हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घडला प्रकार पाहून १५ वर्षांच्या मुलाची गरोदर वहिनी घाबरुन गेली होती. तिने जीव वाचवण्यासाठी विनवणी केली. त्यानंतर या १५ वर्षांच्या मुलाने तिच्यावर बलात्कार केला. सुरुवातीला त्याने तिला सोडून देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण नंतर त्याच्या डोक्यात राग गेला आणि त्याने गरोदर वहिनीवर वार केले. तिच्या पोटावर इतके क्रूर वार केले की पोटातील भ्रूण गर्भाशयातून बाहेर पडलं. वहिनीवर बलात्कार केल्यावर तिचीही अत्यंत क्रूरपणे या मुलाने हत्या केली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
१५ वर्षांच्या मुलाच्या आईलाही अटक
पोलिसांनी १५ वर्षीय मुलाच्या आईलाही अटक केली आहे. कारण तिने त्याला दोघांचे मृतदेह पुरण्यासाठी मदत केली. पोलिसांनी जेव्हा मृतदेह बाहेर काढले तेव्हा ते निर्वस्त्र अवस्थेत होते. पीडितेच्या डोक्याला आणि गंभीर दुखापत झाली होती आणि दोन्ही मृतदेहांचे कपडे जाळण्यात आले होते. या प्रकरणात मुलाच्या आईने मुलाला मदत केली होती त्यामुळे पोलिसांनी तिलाही अटक केली. १५ वर्षांच्या आरोपीने गरोदर वहिनीवर बलात्कार केल्याचीही कबुली दिली. आता या प्रकरणी वैद्यकीय अहवाल येणं बाकी आहे. दरम्यान मृत महिलेच्या आई वडिलांनी जेव्हा तिच्या सासूशी संपर्क केला तेव्हा तिचा अपघाती मृत्यू झाल्याचं सासूने सुनेच्या आई वडिलांना सांगितलं. अपघात झाला असेल तर आम्हाला फोटो दाखवा असं आई वडील म्हणू लागले तेव्हा सासू बहाणे करु लागली. त्यानंतर मुलीच्या वडिलांना संशय आला. त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली ज्यानंतर गुजरातमध्ये घडलेला हा प्रकार समोर आला.
