बिहारमधील मुझफ्फरपूरमधील एक कॉल सेंटर काही महिलांसाठी नरकाइतके भीषण झाले होते. छान, सुरक्षित भविष्याचे स्वप्न दाखवून या कॉल सेंटरमध्ये महिलांना काम करण्यास तयार केले जात असे, त्यानंतर त्यांचे मानसिक आणि लैंगिक शोषण केले जात होते. एका पीडित महिलेने पुढे येऊन तक्रार केल्यामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डीबीआर नेटवर्किंग नावाच्या कंपनीने फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. मात्र केवळ महिला उमेदवारांनीच नोकरीसाठी अर्ज करावा, अशी अटही ठेवली गेली होती.

पोलिसांनी या घोटाळ्याची माहिती देताना सांगितले की, जाहिरात पाहून महिलांनी संपर्क केल्यानंतर त्यांना चांगल्या भविष्याचे स्वप्न दाखविले जात असे. त्यानंतर कॉल सेंटरच्या ट्रेनिंगच्या नावाखाली २० हजार रुपये उकळले जायचे. पैसे भरल्यानंतर त्यांना मुझफ्फरपूर येथील कार्यालयात पाचारण केले जायचे. मुझफ्फरपूरच्या कार्यालयात ट्रेनिंग, मानसिक छळ, फसवणूक आणि काही प्रकरणात बलात्कार आणि गर्भपाताची प्रकरणेही घडली आहेत.

‘वेळेवर घरी जाणाऱ्यांना लाज कशी वाटत नाही?’, सोशल मीडियावर सहकाऱ्याची पोस्ट; संतापलेले नेटकरी म्हणाले…

या कॉल सेंटरमधून निसटलेल्या एका पीडितेने पोलिसांत जाऊन तक्रार केली. एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, नोकरीच्या जाहिरातीला भुलून तीही मुझफ्फरपूरला पोहोचली. तेव्हा तिथे जवळपास १५० महिला होत्या. तिथे तिलक कुमार सिंह नावाच्या व्यक्तीने त्यांना कॉलिंगचे प्रशिक्षण दिले. या महिलांकडून कॉलद्वारे सायबर फसवणूक करून घेण्यात येत होती.

महिलांना सायबर फसवणुकीचे टार्गेटही देण्यात आले होते. ज्या महिलांकडून टार्गेटची पूर्तता होत नसे, त्यांचा मानसिक छळ केला जाई. काही महिलांचे लैंगिक शोषण केले जात असे. ज्या महिलेने तक्रार दाखल केली, तिच्यावर टार्गेट पूर्ण न झाल्यामुळे बलात्कार करण्यात आला होता. तिलक कुमार सिंहने पीडितेला अनेकवेळा शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. गर्भधारणा झाल्यानंतर तिला बळजबरीने गर्भपातही करण्यास सांगितले.

पुरुषांच्या अंडकोषानंतर आता लिंगातही आढळले प्लास्टिक; इरेक्टाईल डिसफंक्शनचा धोका वाढला का?

एफआयआरमध्ये नऊ लोकांची नावे टाकण्यात आली आहेत. नोएडामध्ये राहणारा मनीष कुमार सिंह मुख्य आरोपी असून तोच या कंपनीचा मालक असल्याचे सांगितले जात आहे. तिलक कुमार सिंह याला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. तर उर्वरित आठ जणांचा शोध सुरू आहे.