ओदिशाला विशेष दर्जा देण्याच्या मागणीसाठी बुधवारी दिल्लीत बीजेडीच्या वतीने स्वाभिमान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून त्याला हजर राहण्यासाठी पक्षाचे जवळपास १५ हजारांहून अधिक कार्यकर्ते मंगळवारी सात विशेष गाडय़ांमधून दिल्लीकडे रवाना झाले.
पुरी, कटक, भद्रख, बेरहमपूर, कोरापूत, संबलपूर आणि रूरकेला येथून विशेष गाडय़ा सोडण्यात आल्या असून रामलीला मैदानात मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ओदिशाला विशेष राज्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची भेट घेऊन त्यांना राज्यातील एक कोटी जनतेच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन सादर करण्यात येणार आहे, असे नवीन पटनाईक यांनी वार्ताहरांना सांगितले.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आयोजित केलेल्या ‘अधिकार’ मेळाव्याप्रमाणे बीजेडीचा ‘स्वाभिमान’ मेळावा होत असून त्यामुळे काँग्रेसप्रणीत केंद्र सरकारवर दबाव येईल, असे अनेक नेत्यांचे मत आहे. यापूर्वी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये असा उत्साह पाहिला नव्हता. बुधवारी होणाऱ्या मेळाव्यामुळे आमचे उद्दिष्ट साध्य होईल, असा विश्वास पंचायतराजमंत्री कल्पतरू दास यांनी व्यक्त केला.
दिल्लीत राहणाऱ्या मूळ ओदिशावासीयांचा मेळाव्याला पाठिंबा मिळावा यासाठी राज्यातील काही मंत्री गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून बसले आहेत. राज्यातील एक कोटी जनतेच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन पक्षाच्या आमदार व्ही. सुगनकुमारी दास यांनी पटनाईक यांच्याकडे रविवारी सुपूर्द केले.