सहावा बंगळुरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २६ डिसेंबरपासून सुरू होत असून, त्यामध्ये यंदा ४५ देशांतील १५२ चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. सुप्रसिद्ध अभिनेता कमल हासन या महोत्सवाच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार असून आंद्रेज वाज्दा, असगर फरहादी, इस्तवान झाबो, फ्रॅन्कॉईस ओझोन, थॉमस विण्टेरबर्ग आदी गाजलेल्या दिग्दर्शकांचे चित्रपट यंदाच्या महोत्सवात पाहायला मिळतील.
कर्नाटक सरकारच्या वतीने कर्नाटक चलचित्र अकादमी व कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने महोत्सवाचे आयोजन केले जाते. बर्लिन, कान्स, कालरेव्ही व्ॉरी, मॉस्को, व्हेनिस आणि टोरॅण्टो अशा प्रतिष्ठेच्या सहा ठिकाणच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवांतील पारितोषिक विजेते चित्रपट यंदाच्या महोत्सवात पाहायला मिळणार आहेत.
आशियाई, भारतीय आणि कन्नड चित्रपटांसाठी स्पर्धा विभाग असून रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. महोत्सवाबद्दल बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, कर्नाटक सरकारने या महोत्सवासाठी दोन कोटी रुपयांचा निधी दिला असून, आणखी मदत लागली तरी सरकार निधी देणार आहे.
चीन, कोरिया, जपान, कझाकस्तान, फिलिपाइन्स, बांगलादेश, श्रीलंका व इंडोनेशिया या आशियाई देशांतील प्रचंड गाजलेले चित्रपट हे यंदाच्या महोत्सवाचे वैशिष्टय़ ठरणार आहे. महोत्सवासाठी निवडण्यात आलेल्या चित्रपटांपैकी १४ चित्रपट यंदाच्या विदेशी ऑस्कर विभागात दाखविण्यासाठी निवडलेले चित्रपट आहेत.