देशात करोनाच्या रुग्णांचा नवा उच्चांक रविवारी नोंदविण्यात आला. गेल्या २४ तासांत करोनाचे १५ हजार ४१३ रुग्ण आढळले. यामुळे आठ दिवसांपूर्वी तीन लाखांचा टप्पा ओलांडणाऱ्या भारतातील रुग्णसंख्या ४ लाख १० हजार ४६१ झाली आहे.

उपचाराधीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५० हजारांहून अधिक आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ५५.४९ टक्क्यांवर पोहोचले आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २ लाख २७ हजार ७५५ झाली असून, गेल्या २४ तासांमध्ये १३ हजार ९२५ रुग्ण बरे झाले. देशभरात एक लाख ६९ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

करोनामुळे आतापर्यंत १३ हजार २५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये ३०६ रुग्ण दगावले. देशातील मृतांचे प्रमाण ३.२ टक्के आहे. गेल्या २४ तासांमध्ये १ लाख ९० हजार ७३० चाचण्या घेण्यात आल्या. आतापर्यंत एकूण ६६,७,२२६ नमुना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

दिल्लीत ३,६३० नवे रुग्ण

दिल्लीत पहिल्यांदाच एका दिवसामध्ये ३,६३० नवे रुग्ण नोंदविण्यात आले. तीन दिवसांत दुसऱ्यांदा रुग्णांची दिवसभरातील वाढ ३ हजारांहून अधिक झाली आहे.

राज्यात ३८७० नवे रुग्ण

मुंबई : राज्यात रविवारी करोनाच्या ३,८७० रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्याची एकूण रुग्णसंख्या १,३२,०७५ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत राज्यभरात १०१ करोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांचा आकडा ६,१७० झाला आहे. गेल्या २४ तासांत १,५९१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत ६५,७४४ रुग्ण बरे झाले असून, ६० हजार १४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.