देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरली आहे. उत्तर प्रदेशातून भावाला भेटण्यासाठी निघालेल्या १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीवर स्लीपर कोच बसमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने बस चालक आणि कंडक्टर यांनी या मुलीला बसमध्ये बसवलं आमि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी काश्मीर गेट पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पीडित मुलगी ही उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील आहे.
नेमकी घटना काय घडली?
१६ वर्षांची मुलगी ४ ऑगस्टच्या रात्री घरातून कुणालाही न सांगता नोएडा या ठिकाणी राहणाऱ्या चुलत भावला भेटण्यासाठी निघाली होती. मात्र पाऊस मोठ्या प्रमाणावर पडू लागल्याने अंधार झाला आणि तिला स्टॉप कळला नाही त्यामुळे ती ग्रेटर नोएडातील परी चौक या ठिकाणी चुकून उतरली. या मुलीला परी चौकातून पुढे जायचं होतं. तिला एक स्लीपर बस जाताना दिसली. त्या मुलीने हात केला त्यामुळे बस थांबली. बस चालक कुलदीप आणि कंडक्टर संदीप यांनी बस नोएडा सेक्टर ६३ च्या दिशेन जाते आहे असं सांगितलं. त्या मुलीला विश्वासाने बसमध्ये बसवलं. बस सुरु झाल्यानंतर काही वेळाने कंडक्टरने या मुलीशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चालक आणि कंडक्टर या दोघांनीही तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. मुलीने या दोघांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी तिला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर काश्मीर गेट आयएसबीटी जवळच्या रिंग रोडवर या पीडितेला फेकण्यात आलं आणि आरोपींनी पळ काढला. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.
सदर घटनेनंतर पीडितेने तातडीने काश्मीर गेट पोलीस ठाणे गाठलं आणि तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. ज्यानंतर पोलिसांनी तिमारपूर या ठिकाणाहून कुलदीप आणि संदीप या दोघांना अटक केली. तसंच स्लीपर बस ही फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
पीडितेने पोलिसांना काय सांगितलं?
विद्यार्थिनीने कश्मीरी गेट पोलिसांशी संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तिमारपूर येथील एका बस पार्किंगमधून दोन्ही आरोपींना अटक केली. घटनेत वापरलेली स्लीपर बस पोलिसांनी ताब्यात घेतली असून तिची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येत आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, बसमध्ये बिघाड झाल्यानंतर आरोपी बसला दुरुस्तीसाठी सूरजपूर येथील वर्कशॉपमध्ये घेऊन गेले होते. बसची दुरुस्ती झाल्यानंतर चालक आणि कंडक्टर रिकामी बस घेऊन तिमारपूरच्या दिशेने जात होते. त्याचदरम्यान परी चौक येथे त्यांना विद्यार्थिनी दिसली. परी चौक ते कश्मीरी गेट असा सुमारे ४७ किलोमीटरचा प्रवास बसने केला. बस स्लीपर प्रकारची असल्याने आणि त्याला पडदे असल्याने बाहेरून बसच्या आतील भागात काय सुरू आहे, हे कोणालाही दिसले नाही.
