आपल्या संघातील सहकाऱ्यांसोबत चेन्नईच्या मरिना बीचवर पोहायला गेला असताना १६ वर्षीय हॉकीपटूला आपले प्राण गमवावे लागले आहेत. एस. प्रजेश असं या खेळाडूचं नाव असून तो तामिळनाडूच्या कुण्णूर शहरात राहत होता. प्रजेश आपल्या शाळेतील संघाकडून चेन्नईत हॉकी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गेला असताना ही दुर्दैवी घटना घडल्याचं बोललं जातंय.

प्रजेश कुण्णूर येथील सरकारी शाळेत अकरावीच्या वर्गात शिकत होता. चेन्नईच्या नेहरु मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या स्थानिक हॉकी स्पर्धेसाठी प्रजेशच्या शाळेतून संघ चेन्नईला गेला होता. यावेळी प्रजेशसोबत १४ मुलं होती. प्रजेशच्या संघाने शनिवारी आपला सामना खेळल्यानंतर चेन्नईच्या मरिना बीचवर पोहायला जाण्याचा बेत आखला. मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीत संघातील सिनीअर खेळाडूंनी आपल्याला याची कल्पना नसल्याचं सांगितलं आहे.

प्रजेश आणि त्याचे १० सहकारी मरिना बीचवर पोहण्यासाठी गेले. मात्र काही वेळानंतर १० पैकी एकाही मुलाचा फोन नंबर लागत नसल्याने संघातल्या सिनीअर खेळाडूंनी शोधाशोध सुरु केली. अखेर प्रजेशसोबत गेलेल्या १० जणांची आणि सिनीअर खेळाडूंची भेट झाली असता, पोहायला गेलेला प्रजेश नाहीसा झाल्याचं समोर आलं. यावेळी सिनीअर खेळाडूंनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. आपला मुलगा हरवल्याची बातमी समजताच, प्रजेशचे पालकही चेन्नईत दाखल झाले.

पोलिस आणि स्थानिक मच्छिमारांनी रात्रभर मरिना बीचवर समुद्रात प्रजेशचा शोध घेतला, मात्र त्यांच्या हातात काही लागलं नाही. अखेर सोमवारी दुपारी प्रजेशचा मृतदेह वाहत किनाऱ्यावर आल्यानंतर या अपघाताची पुष्टी झाली. पोलिसांनी प्रजेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असुन प्राथमिकदृष्ट्या यात कोणताही संशयास्पद प्रकार आढळला नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.