161 gelatin sticks found near school in Uttarakhand Almora police probe on : उत्तराखंड पोलिसांनी अल्मोरा येथील एका सरकारी शाळेच्या परिसरातून १६१ जिलेटिनच्या कांड्या जप्त करण्यात आल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात शक्तिशाली स्फोटके आढळून आल्याने खळबळ उडाली असून परिसरात सुरक्षा कडक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. सरकारी उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुलांना खेळताना जवळच्या झुडपांमध्ये एक संशयास्पद वस्तू दिसल्याबद्दल पोलिसांना कळवल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी ही बाब समोर आली.

माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे एक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तो परिसर सील केला. बॉम्ब निकामी करणारे पथक आणि श्वान पथकाने कसून शोध घेतला आणि स्फोटके जप्त केली. पोलिसांनी घटनास्थळावरून नमुने गोळा केले. पोलिसांनी इंडियन एक्सप्लोझिव्ह अॅक्ट अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अल्मोराचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) देवेंद्र पिंचा यांनी या घटनेची पुष्टी केली आणि तपास सुरू असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आणि तपास झाल्यानंतर खरी माहिती दिली जाईल असेही ते म्हणाले.

“डाबरा गावात शाळेच्या जवळ झुडपांमध्ये जवळपास १६१ जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या आहेत. स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी बीडीएस पथकाला बोलावून घेतले, ज्यांनी संपूर्ण परिसराची आणि शोध पूर्ण केला. योग्य त्या कलमांच्या अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई केली जात आहे,” असे त्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, रस्त्यांच्या बांधकामावेळी दगड फोडण्यासाठी जिलेटिन कांड्यांचा वापर केला जातो. एसएसपी (SSP) यांनी पुढे सांगितले की, चार पथके तयार करण्यात आली आहेत आणि तपासकर्ते आता हे स्फोटक साहित्य शाळेजवळ कोणी आणि कशासाठी ठेवले, हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

लाल किल्ला परिसरात झालेला स्फोट आणि त्याआधी फरिदाबाद येथील अल फलाह विद्यापीठाच्या जवळ २९०० किलो स्फोटके जप्त केल्यानंतर, देशभरातील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडल्याची ही घटना समोर आली आहे.

दिल्ली पोलिसींनी १० नोव्हेंबर रोजी विद्यापीठाजवळून स्फोटके जप्त केले आणि या विद्यापीठाशी संबंधित डॉक्टरांना अटक केले. त्यानंतर काश्मीरी डॉक्टर उमर नबीने लाल किल्ल्याच्या बाहेर एका कारमध्ये स्फोट घडवून आणला. या स्फोटात १५ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले होते.