MBBS च्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने १७ पानी सुसाईड नोट लिहून आयुष्य संपवलं आहे. AIIMS राजकोट या ठिकाणी हा विद्यार्थी MBBS च्या शेवटच्या वर्षात शिकत होता. त्याची १७ पानांची सुसाईड नोट पोलिसांना मिळाली असून यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे.
नेमकी घटना काय घडली?
१४ मार्चला एका विद्यार्थ्याचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ आढळून आला होता. ज्या मुलाने आत्महत्या केली तो मूळचा राजस्थानच्या जैसलमेरचा होता. त्याचा जो काही छळ केला जात होता तो असह्य झाल्याने या मुलाने आयुष्य संपवलं आहे. जानेवारी २०२६ पासून माझा छळ होत होता असं मुलाने त्याच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. या मुलाच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. हे पाच आरोपी राजस्थान, हरियाणा आणि भरुच येथील आहेत. एका मुलीशी मैत्री असल्याने हे पाचजण आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याला चिडवायचे आणि त्याचा छळ करत होते. आपल्याबरोबर काय घडलं? ते या विद्यार्थ्याने त्याच्या १७ पानांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. २७ जानेवारीला आपल्याला मारहाण करण्यात आली. त्यानंतर आता अशी वेळ आली आहे की आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही असं या मुलाने या नोटमध्ये म्हटलं आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?
पोलीस सहाय्यक आयुक्त चिंतन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार पाच आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) कलम ३ (सेक्शन ५) सामूहिक गुन्हा. अशी कलमं लावण्यात आली आहेत. ज्या मुलाने आत्महत्या केली त्याने आधीही असा प्रयत्न केला होता अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. तसंच त्यावेळी पोलिसांत तक्रार देण्यात आली नाही. त्यावेळी पोलिसात तक्रार दिली असती तर कदाचित आमचा मुलगा वाचला असता असं सदर मुलाच्या कुटुंबाने म्हटलं आहे. ज्या मुलाने आत्महत्या केली तो MBBS च्या शेवटच्या वर्षाला होता. त्याने परीक्षेची तयारी केली होती. मात्र त्याला सातत्याने छळलं जात होतं आणि हेटाळणी केली जात होती. दरम्यान ज्या मुलांना अटक केली आहे त्यांचीही परीक्षा होणार आहे. न्यायालयाने त्यांना परीक्षा देण्याची सशर्त संमती दिली आहे. या सगळ्यांना पोलीस बंदोबस्तातच परीक्षा केंद्रात नेलं जाणार आहे आणि तिथून परत तुरुंगात आणलं जाणार आहे. दरम्यान पोलीस या प्रकरणात आणखी पुरावे शोधत आहेत आणि तपासही करत आहेत अशी माहितीही पटेल यांनी दिली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
