कोलकाता येथील राहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जेवणाच्या डब्ब्याचा स्फोट होऊन एका १७ वर्षीय मुलाचा भयावह अंत झाला आहे. संबंधित मृत मुलाच्या आजोबांना राहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक स्टील धातूचा जेवणाचा डब्बा आढळला होता. आजोबांनी तो डब्बा घरी आणला आणि त्यामध्ये काय आहे? हे पाहण्यास नातवाला सांगितले.

त्यानुसार नातवाने संबंधित जेवणाचा डब्बा उघडण्याचा प्रयत्न केला असता त्या डब्ब्याचा भयंकर स्फोट झाला आहे. या घटनेत १७ वर्षीय नातू गंभीर जखमी झाला. ही घटना घडताच मुलाच्या नातेवाईकांनी त्याला तातडीने कोलकात्यापासून ३० किमी अंतरावर असलेल्या बराकपूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

साहील शेख असं मृत पावलेल्या मुलाचं नाव आहे. तर अब्दुल हमीद असं जेवणाचा डब्बा घरी आणणाऱ्या मृताच्या आजोबाचं नाव आहे. अब्दुल हमीद हे भंगार गोळा करण्याचं काम करतात. घटनेच्या दिवशी शनिवारी हमीद हे उत्तर २४ परगना जिल्ह्यातील राहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भंगार गोळा करण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांना राहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक स्टील धातूचा जेवणाचा डब्बा आढळला. त्यांनी तो डब्बा घरी आणला.

घरी आल्यानंतर त्यांनी आपला नातू साहील याला संबंधित डब्बा उघडून पाहण्यास सांगितलं. साहील हा डब्बा उघडण्याचा प्रयत्न करत असताना अचानक मोठा स्फोट झाला आणि साहील रक्तबंबाळ अवस्थेत पडला. त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.