अमेरिकेतील टेक्सासमध्ये प्राथमिक शाळेत गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. १८ वर्षीय हल्लेखोराने शाळेत घुसून अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २१ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये तीन शिक्षक १८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी चिंता व्यक्त केली असून नव्याने बंदुकींवर बंदी आणण्यासंबंधी भाष्य केलं आहे. तसंच आपण केव्हा या गन लॉबीविरोधात उभं राहणार आहोत? अशी विचारणा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, टेक्सासच्या उवाल्डे शहरात हा गोळीबार झाला आहे. येथे १८ वर्षाच्या एका हल्लेखोराने रॉब प्राथमिक शाळेत अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात १८ विद्यार्थी आणि तीन शिक्षकांनी आपले प्राण गमावले आहेत. हल्लेखोरालाही ठार करण्यात आलं आहे. तो उवाल्डे हायस्कूलचा विद्यार्थी होता.

हल्लेखोराने आजीवरही केला हल्ला

हल्लेखोरासंबंधी मोठा खुलासा झाला आहे. सीएनएनने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, शाळेत जाण्याआधी हल्लेखोराने आपल्या आजीला गोळी घातली होती. यानंतर त्यांना सॅन एंटोनियो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आजीला गोळी घातल्यानंतर हल्लेखोर फरार झाला होता. यानंतर तो शाळेत पोहोचला आणि विद्यार्थ्यांवर गोळीबार केला.

टेक्सासच्या सार्वजनिक सुरक्षा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करण्याआधी हल्लोखोरासोबत दोन घटना घडल्या. सर्वात आधी त्याने आपल्या आजीला गोळी घातली. नंतर शाळेजवळ एका वाहनाला धडक दिली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेत घुसण्याआधी हल्लेखोराने बुलेटप्रूफ जॅकेट घातलं होतं, तसंच हातात बंदुक होती. यानंतर तो शाळेतील वेगवेगळ्या वर्गात गेला आणि गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारात २१ जणांना आपला जीव गमवावा लागला.

कारवाई करण्याची वेळ – जो बायडन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी एक राष्ट्र म्हणून आपल्याला देवाच्या नावे गन लॉबीविरोधात कधी उभे राहणार आहोत? असं विचारावं लागणार असल्याचं म्हटलं आहे. आई, वडील तसंच देशातील प्रत्येक नागरिकाच्या वेदनांना आता कारवाईचं रुप द्यावं लागेल असंही ते म्हणाले आहेत. प्रत्येक अधिकाऱ्याला ही काम करण्याची वेळ आहे असं स्पष्ट करावं लागेल असंही सांगितलं.

जो बायडन म्हणाले की, “आज अनेक आई-वडील आपल्या मुलांना पुन्हा पाहू शकणार नाहीत. मुलांना गमावण्याची ही वेदना आपल्या शऱिरातून आत्मा काढून घेण्यासारखी आहे”.

अमेरिकेत २०२२ मध्ये सामूहिक गोळीबाराच्या २१२ घटना

अमेरिकेत सामूहिक गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. Gun Violence Archive च्या माहितीनुसार, २०२२ मध्ये गोळीबाराच्या किमान २१२ घटना झाल्या आहेत. GVA नुसार, ज्या घटनांमध्ये चार लोकांचा मृत्यू किंवा जखमी झाले आहेत त्यांना सामूहिक गोळीबारात समाविष्ट करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 18 students among 21 killed in texas school shooting us president biden calls for fresh firearms curbs sgy
First published on: 25-05-2022 at 08:14 IST