मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे एका १९ वर्षीय तरुणीचं दिवसाढवळ्या अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणी आपल्या कुटुंबासह ग्वाल्हेर येथे आली होती. दरम्यान, सोमवारी दुपारी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात अपहरणकर्त्यांनी ग्वाल्हेर येथील एका पेट्रोल पंपाजवळून तिचं अपहरण केलं. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील पेट्रोल पंपावरून सोमवारी दुपारी मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञातांनी एका तरुणीचं दिवसाढवळ्या अपहरण केलं. यावेळी घटनास्थळी एकूण सहा लोक उपस्थित होते. मात्र त्यांनी अपहरणकर्त्यांचा कसलाही प्रतिकार केला नाही.




हेही वाचा- “तू खूप सेक्सी आहेस, माझं स्वप्न…”; भारतीय तरुणाकडून रशियन युवतीचा विनयभंग, VIDEO व्हायरल
या घटनेबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक राजेश सिंह चंदेल यांनी सांगितलं की, पीडित तरुणी भिंड येथील रहिवासी असून ती आपल्या कुटुंबासह बसने ग्वाल्हेरला आली होती. ती बसमधून खाली उतरताच अपहरणकर्त्यांनी तिचं दुचाकीवरून अपहरण केलं. काही दिवसांपूर्वी एक मुलगा त्यांच्या गावात आला होता, ज्याच्या विरोधात पीडितेच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली होती. दोन संशयितांपैकी एकाची ओळख पटली असून तो पीडितेच्या गावचा आहे. आरोपीनं यापूर्वी भिंडमध्येही पीडितेच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याची माहिती आहे, असंही चंदेल म्हणाले.
पेट्रोल पंपाजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या व्हिडीओ फुटेजमध्ये एक आरोपी दुचाकीवर थांबलेला दिसत आहे. तर अन्य एकजण तरुणीला ओढत दुचाकीपर्यंत आणताना दिसत आहे. यानंतर आरोपीने पीडितेला थेट उचलून दुचाकीवर बसवलं. तरुणीला दुचाकीवर बसवताच दुसरा साथीदार पळून जाताना दिसत आहे. तर दुसरा अपहरणकर्ता दुचाकीच्या मागे धावताना दिसत आहे.