हरयाणातील सोनीपतमधील बॉम्बस्फोटाप्रकरणी न्यायालयाने दहशतवादी अब्दुल करीम टुंडाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय न्यायालयाने टुंडाला दीड लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

सोनीपतमध्ये २८ सप्टेंबर १९९६ रोजी दोन बॉम्बस्फोट झाल्याने संपूर्ण देश हादरला होता. या स्फोटांमध्ये १२ जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटामागे अब्दुल करीम टुंडाचा हात असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी सोनीपतमधील न्यायालयाने टुंडाला सोमवारी दोषी ठरवले होते. मंगळवारी न्यायालयाने टुंडाच्या शिक्षेवर निकाला दिला. टुंडाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

टुंडा हा ‘लष्कर- ए- तोयबा’ या संघटनेचा दहशतवादी असून १९९४ ते १९९८ या कालावधीत दिल्लीसह भारतातील विविध शहरांमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये टुंडा सहभागी झाला होता. टुंडाचा एकूण ३३ दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग होता. त्याच्याविरोधात दिल्लीत २२ तर पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात ११ खटले प्रलंबित आहेत. दिल्लीत १९९७ साली झालेल्या दोन वेगवेगळ्या बाँबस्फोटांप्रकरणी अब्दुल करीम टुंडाला दोन वर्षांपूर्वी दोषमुक्त करण्यात आले होते.

स्फोटके तयार करण्यात पटाईत असलेल्या टुंडाने १९८५ मध्ये आयएसआयमध्ये प्रशिक्षण घेतले होते. ७५ वर्षीय टुंडाला ऑगस्ट २०१३ मध्ये अटक करण्यात आली होती. अब्दुल करीम टुंडा हा कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम याचा निकटचा साथीदार म्हणून ओळखला जातो. टुंडा पोलिसांना जवळपास १९ वर्षे गुंगारा देत होता. टुंडाकडे पाकिस्तानचा पासपोर्टही होता. ऑगस्ट २०१३ मध्ये टुंडाला दिल्ली पोलिसांनी भारत-नेपाळ सीमेवरुन अटक केली होती.