सूक्ष्मदर्शक यंत्र अधिक प्रभावीपणे कार्यरत करणाऱ्या तीन शास्त्रज्ञांना यंदाचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये एरिक बेत्झीग व विल्यम मोर्नर या अमेरिकेच्या दोन आणि स्टीफन हेल या जर्मनीच्या शास्त्रज्ञाचा समावेश आहे.
सूक्ष्मदर्शकातून आधी ज्या पद्धतीने एखाद्या बाबीचे अवलोकन केले जात असे, त्यापेक्षा कितीतरी अधिक चांगल्या पद्धतीने तपशील बघण्याची पद्धती या तिघांनी विकसित केल्याबद्दल नोबेल पारितोषिकासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. सूक्ष्मकणांमधून बाहेर पडणाऱ्या सूक्ष्मप्रकाशाच्या विकासाचा अभ्यास केल्याबद्दल त्यांची  निवड करण्यात आली आहे.बेत्झीग, मोर्नर व हेल यांनी अति-विकसित ‘फ्ल्युरोसीन मॉयक्रोस्कोपी’ यंत्रणेचा शोध लावला असून त्याद्वारेच सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे अधिक चांगल्या पद्धतीने अवलोकन करता येणे शक्य होते. शास्त्रज्ञांच्या याच कामगिरीची दखल घेऊन रसायनशास्त्राच्या नोबेल पारितोषिकासाठी त्यांची निवड करण्यात आली असल्याचे ‘रॉयल स्वीडिश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ने म्हटले आहे. सूक्ष्मदर्शी संशोधन अतिसूक्ष्म पातळीवर आणून ठेवण्याकामी या तिघांनी महत्त्वपूर्ण कार्य केल्याची दखल निवड समितीने घेतली.
बेत्झीग (५४) हे व्हिर्जिनिया प्रांतातील अ‍ॅशबर्न येथील हॉवर्ड ह्य़ुजेस मेडिकल इन्स्टिटय़ूट मध्ये काम करतात. हेल हे (५१) हे जर्मनीच्या ‘मॅक्स प्लॅन्क इन्स्टिटय़ूट फॉर बायोफिजिकल केमिस्ट्री’ या संस्थेत संचालकपदी कार्यरत आहेत तर मोर्नर (६१) हे कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्राध्यापक आहेत.
आतापर्यंत ऑप्टिकल मायक्रोस्कोपचे काम फार मर्यादित पातळीवर होत असे. ही मर्यादा ०.२ मायक्रोमीटरच्या घरात होती. मात्र, या तीन शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या नवीन सूक्ष्मदर्शी यंत्रणेमुळे सदर मर्यादा ओलांडणे आता शक्य झाले आहे.
या तीन शास्त्रज्ञांनी केलेल्या कार्यामुळे अनेक क्षेत्रांची प्रगती झाली असून जीवशास्त्राच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही अधिक संशोधन करण्याकामी वाव मिळू शकेल, असे अमेरिकन केमिकल सोसायटीचे अध्यक्ष टॉम बर्टन यांनी सांगितले.
दरम्यान, साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेत्याची घोषणा गुरुवारी तर शांतता पुरस्काराची घोषणा शुक्रवारी होईल. नोबेल पुरस्कार प्रणेते अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतीदिनी, १० डिसेंबर रोजी हा पुरस्कार संबंधित विजेत्यांना प्रदान करण्यात येतो.
’बेत्झीग, मोर्नर व हेल यांनी अति-विकसित ‘फ्ल्युरोसीन मॉयक्रोस्कोपी’ यंत्रणेचा शोध लावला असून त्याद्वारेच सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे अधिक चांगल्या पद्धतीने अवलोकन करता येणे शक्य होते.
’शास्त्रज्ञांच्या याच कामगिरीची दखल घेऊन रसायनशास्त्राच्या नोबेल पारितोषिकासाठी त्यांची निवड करण्यात आली असल्याचे ‘रॉयल स्वीडिश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ने म्हटले आहे.
’सूक्ष्मदर्शी संशोधन अतिसूक्ष्म पातळीवर आणून ठेवण्याकामी या तिघांनी महत्त्वपूर्ण कार्य केल्याची दखल निवड समितीने घेतली.