एका कच्च्या कैद्याला भोसकून ठार मारण्यात आल्याची घटना ताजी असतानाच कडक सुरक्षितता असलेल्या तिहार तुरुंगातील दोन कैदी गुरुवारी रहस्यमय परिस्थितीत मरण पावले.
मरण पावलेल्यांची नावे रितेश मित्तल ऊर्फ शालू (३२) आणि अमित ऊर्फ पांडा (२६) अशी असून, छुप्या रीतीने तुरुंगात आणलेला कुठला तरी अमलीपदार्थ प्राशन केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असल्याची कारागृहाच्या अधिकाऱ्यांना शंका आहे.
एका खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेला रितेश याने तुरुंगात ११ वर्षे घालवली होती, तर अमितला खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्य़ात शिक्षा करण्यात आली होती. त्यांच्या सोबतच्या कैद्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुठून तरी मिळवलेल्या एका औषधाचा हे दोघे रात्री वास घेत होते. असे करणे घातक ठरू शकते, असे या लोकांनी त्यांना सांगितले होते, परंतु त्यांनी तिकडे दुर्लक्ष केले.
सकाळपर्यंत त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे अधिकाऱ्यांनी तुरुंगातील डॉक्टरांना पाचारण केले, परंतु त्यांना अधिक उपचारांची गरज असल्याचे लक्षात आल्यामुळे डीडीयू रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे सकाळी साडेनऊच्या सुमारास ते मरण पावले, असे कारागृह उपमहानिरीक्षक मुकेश प्रसाद यांनी सांगितले. मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, या प्रकाराची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.