पोर्टलँड : ओरेगॉनमधील पोर्टलँड येथे शनिवारी सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या गोळीबारात दोन ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत.

गेल्या सहा महिन्यात येथे गोळीबारातील हिंसाचाराच्या घटना वाढल्या असून  महापौर टेड व्हीलर यांनी सांगितले, की करोना काळात बेदरकारपणे गोळीबाराच्या घटना चिंताजनक आहेत. त्यामुळे पोर्टलँड पोलिस यंत्रणेवर ताण येत आहे. गेल्या वर्षभरात १२५ अधिकारी निवृत्त झाले असून आता आणखी अधिकारी निवृत्त होणार असल्याने मनुष्यबळाची कमतरता भासणार आहे.

या गोळीबाराच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. मिनियापोलिस येथे जॉर्ज फ्लॉइडचा पोलिसी अत्याचारात मृत्यू झाल्यानंतर  ब्लॅक लाइव्हज मॅटर चळवळ झाली होती. त्या वेळी पोर्टलँड शहर आयोगाने मनुष्यबळ कमी करून बंदूक हिंसाचार पथकाचा निधी कमी केला होता. त्यानंतर चक लॉव्हेल यांनी या हिंसाचाराविरोधात नवा पोलिसी चमू उभा केला होता. शनिवारी झालेल्या हिंसाचारामुळे आतापर्यंत बंदुकीच्या मार्गाने हिंसाचारात बळी पडलेल्यांची संख्या आता ५१ झाली आहे. पोर्टलँडमध्ये या वर्षांत गोळीबाराच्या ५७० घटना झाल्या आहेत. यातील बहुतेक गोळीबार हे टोळ्यांशी संबंधित होते. शनिवारचा गोळीबार टोळ्यांशी संबंधित होता की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही, असे लॉव्हेल यांनी म्हटले आहे.