अमेरिका आणि इस्रायल या देशांनी इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर इराणने देखील प्रत्युत्तरादाखल हल्ले सुरू केले आहेत. सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी पहाटे दिलेल्या माहितीनुसार, रियाधमधील अमेरिकन दूतावासावर दोन इराणी ड्रोन्सने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे तिथे मर्यादित स्वरुपात आग लागल्याचे आणि काही प्रमाणात इमारतींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गंभीर इशारा दिला असून ते म्हणाले की, “याचे प्रत्युत्तर काय असेल हे तुम्हाला लवकरच कळेल.”
सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्यक्त केलेल्या प्राथमिक अंदाजामध्ये, दूतावासाच्या संकुलावर दोन ड्रोनने हल्ला झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे लहानशी आग लागली. या हल्ल्यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.
ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ आहेत त्यांच्यावर इराणकडून क्षेपणास्त्र आणि ड्रोन यांच्या माध्यमातून हल्ले केले जात आहेत. अमेरिका आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे इराणमध्ये शनिवारी, २८ फेब्रुवारी रोजी केलेल्या हल्ल्यांनंतर हा संघर्ष सुरू झाला आहे. अमेरिका-इस्रायल यांच्या हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर इराणने इस्रायल, मध्य पूर्व आणि अरब देशांमधील अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मारा केला आहे . इराणने जसास तसे उत्तर देण्यास सुरूवात केल्याने या संघर्षाची तीव्रता वाढली आहे. या संघर्षाने चौथ्या दिवसात प्रवेश केला आहे. दरम्यान इस्रायल-अमेरिका विरूद्ध इराण संघर्षाच्या झळा या संपूर्ण प्रदेशाला सोसाव्या लागत आहेत.
ट्रम्प काय म्हणाले?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यानंतर इराणचे नाव न घेता लवकरच प्रत्युत्तर दिले जाईल असा इशारा दिला आहे. “प्रत्युत्तर काय असेल हे तुम्हाला लवकरच कळेल,” असे ट्रम्प न्यूजनेशनशी बोलताना एका मुलाखतीत म्हणाल्याचे एका रिपोर्टरने एक्सवर पोस्ट केले आहे. दरम्यान ट्रम्प यांचे हे विधान अमेरिकेच्या दूतावासावरील हल्ला आणि इराणबरोबर सुरू असलेल्या संघर्षात अमेरिकन लष्करी जवानांचा झालेला मृत्यू या दोन्ही घटनांच्या संदर्भात केले आहे.
अमेरिकन दूतावासाने अमेरिकन नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. हल्ल्यानंतर लगेचच अमेरिकन दूतावासाने रियाध, जेद्दाह आणि दहरानमधील अमेरिकन नागरिकांसाठी ‘शेल्टर इन प्लेस’ अॅडव्हायजरी जारी केली. याच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत दूतावासाला भेट देणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले.
सौदी प्रशासनाने ड्रोन पाडण्यात आले का? किंवा ते हवाई सुरक्षा प्रणाली भेदून राजधानीच्या शहरात कसे घुसले याबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. सौदी अरेबियाच्या सरकारी माध्यम कार्यालयाने यासंबंधी प्रश्नांना कोणताही प्रतिसाद दिला नाही.
