अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्यांच्या तिसऱ्या मैत्रिणीला अटक केली आहे. कारण या दोघींची हत्या केल्याचा आरोप तिच्यावर आहे. केरळच्या केशवदासपुरमची निवासी मेरी मॅथ्यू आणि त्रिशूरच्या मुदिक्कोडची रहिवासी असलेली अंजना या दोघींची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात तिसऱ्या मैत्रिणीला म्हणजेच कोट्टायमची रहिवासी असलेल्या अनिलाला पोलिसांनी अटक केली आहे. या धक्कादायक प्रकरणामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत. कारण या तिघींनी ओणम साजरा केला होता. त्यानंतर दोन मैत्रिणींची हत्या करण्यात आली.
पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?
अमेरिकेहून या दोन महिलांचे मृतदेह केरळला आणण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. कॅलिफोर्निया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २८ ऑगस्टाला दोन महिलांचे मृतदेह त्यांना आढळून आले. या प्रकरणात त्या दोघींच्या मैत्रिणीला अटक करण्यात आली आहे. तिची चौकशी सध्या पोलिसांकडून करण्यात येते आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
नेमकं काय घडलं, प्रकरण काय?
कॅलिफोर्निया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २८ ऑगस्टच्या दिवशी दुपारी १२ च्या सुमारास पोलीस अधिकाऱ्यांना मिलपिटासमध्ये एका पार्किंग लॉटमध्ये हिट अँड रन प्रकरणाची माहिती मिळाली. पोलिसांना प्रत्यक्षदर्शींनी हे सांगितलं की निळ्या रंगाची एक SUV एका महिलेला धडक देऊन तिथून गेली आहे. पोलिसांना या ठिकाणी ती महिला जखमी अवस्थेत सापडली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांना नंतर एका पार्किंग लॉटजवळ निळ्या रंगाची SUV कार मिळाली. यानंतर पोलिसांनी अनिला नावाच्या महिलेला अटक केली. ही महिलाच ही कार चालवत होती.
मेरीचा मृतदेह सॅन होजेमध्ये सापडला
पोलिसांनी असंही सांगितलं की यानंतर पोलिसांना सॅन होजेच्या एका इमारतीत एका महिलेचा मृतदेह आढळून आला. तिच्यावर चाकू हल्ला करुन तिला ठार करण्यात आलं होतं. या महिलेचं नाव मेरी असं आहे. अंजनाला कारने धडक देऊन मारण्यात आलं. मेरीची हत्या चाकू भोसकून करण्यात आली. या हत्यांमागच्या कारणाचा उलगडा अद्याप झालेला नाही.
केंद्रीय मंत्री सुरेश गोपी काय म्हणाले?
केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी सांगितलं की अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामध्ये दोन महिलांची हत्या करण्यात आली. त्यांचे मृतदेह केरळमध्ये आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. अंजनाच्या नात्यातील एका माणसाने सांगितलं की अनिला, मेरी आणि अंजना या तिघीही चांगल्या मैत्रिणी होत्या. या तिघीही एकाच इमारतीत वास्तव्य करत होत्या. सुरुवातीला अंजनाच्या मृत्यूची बातमी समोर आली आणि त्यानंतर मेरीच्या मृत्यूची बातमी समोर आली. या तिघी चांगल्या मैत्रिणी होत्या. पण अनिलाला अंजनाचे कुटुंबीय ओळखत नव्हते. कारण त्यांचं बोलणं फक्त व्हिडीओ कॉलवरच एकदा किंवा दोनदा झालं होतं. तिघीही महिला वेगवेगळ्या नोकऱ्या करत होत्या. अंजना २०२१ मध्ये अमेरिकेला गेली होती. तिच्या मृत्यूनंतर आता तिचा पती आणि एक मुलगी असं कुटुंब आहे. पोलिसांनी या प्रकऱणी पुढील तपास सुरू आहे असंही सांगितलं आहे.
