Attack on Hindu in Bangladesh : बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार काही थांबायचं नाव घेत नाहीयेत असंच चित्र आहे. मागच्या काही दिवसांमध्ये चार हिंदू तरुणांची हत्या करण्यात आली. त्यानंतर आता सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंदू विधवेवर दोघांनी सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर तिचे क्रूर हाल केले.

पोलिसांनी या प्रकरणी काय सांगितलं?

बांगलादेश पोलीस म्हणाले, “झेनैदाह जिल्ह्यात ही घटना घडली आहे. एका हिंदू विधवा महिलेवर दोघांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिचे केस कापण्यात आले आणि तिला झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. शाहिन आणि त्याच्या भावाने दुमजली घर विकत घेतलं होतं. त्यानंतर शाहिनची या महिलेवर वाईट नजर होती. त्याने तिला काही अश्लील इशारेही केले होते. शनिवारी संध्याकाळी शाहिन आणि त्याचा साथीदार महिलेच्या घरात घुसला. त्या दोघांनीही तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला झाडाला बांधून तिचे केस कापण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ तयार करुन तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. महिला अत्याचार सहन करुन बेशुद्ध झाली ज्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

बांगलादेश पोलिसांनी काय सांगितलं?

बांगलादेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तसंच या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिला गप्प बसण्याची धमकी देण्यात आली. पण सदर महिला ओरडू लागली, त्यानंतर शाहिन चिडला आणि त्याने या विधवेला झाडाला बांधलं, तिचे केस कापले आणि तिला मारहाण केली. या प्रकरणी पोलीस अधीक्षक बिलाल हुसैन म्हणाले पीडितेला आम्ही पोलीस ठाण्यात बोलवलं होतं. तिची तक्रार नोंदवून घेतल्यानतर आम्ही आता आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करु. बांगलादेशात आत्तापर्यंत दीपू दास, अमृत मंडल, बजेंद्र विस्वास आणि खोकोन दास या चार हिंदूंची हत्या करण्यात आली. दीपू दासवर ईशनिंदेचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आता महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली.

महिलेने दिलेल्या माहितीनुसार शाहिन तिला त्रास द्यायला सुरुवात केली होती. शाहिन तिला अश्लील इशारे करायचा. सदर महिला ४० वर्षीय आहे. तिला त्रास देण्यात येत होता, शनिवारी ती घरात होती, त्यावेळी तिच्यावर शाहिन आणि त्याच्या साथीदाराने बलात्कार केला. ही महिला जेव्हा बेशुद्ध झाली तेव्हा तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ती शुद्धीवर आल्यानंतर तिचा जबाब पोलिसांनी नोंदवला. पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहेत.