चीनमध्ये तरुणींवर हल्ला केल्याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. छेडछाडीला विरोध केल्याने या तरुणांनी मुलींवर हल्ला करत लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. तरुणी रेस्तराँमध्ये जेवत असताना एक आरोपी तरुणीला स्पर्श करत छेडत होता. यावेळी तरुणीने विरोध केला असता आरोपींनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेनंतर चीनमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे.

सीसीटीव्हीत आरोपी जेवायला बसलेल्या तरुणीला जाणुनबुजून स्पर्श करताना दिसत आहे. यावेळी तरुणीसोबत तिच्या मैत्रिणीदेखील होत्या. तरुणीने त्याचा हात झटकताच त्याने तिला कानाखाली लगावली. यानंतर तरुणीने विरोध केला असता त्याने आणि त्याच्या मित्रांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. दोन तरुणींना फरफटत बाहेर नेत लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तर एक तरुणी रेस्तराँमध्ये खाली जमिनीवर पडल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे.

हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून चीनमधील महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. तसंच यानिमित्ताने लैंगिकतेच्या आधारावर होणाऱ्या हिंसेवरही चर्चा सुरु झाली आहे. यासोबत महिला हक्कांचा मुद्दाही प्रकर्षाने समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ जणांना अटक करण्यात आली असून एकाचा शोध सुरु आहे. जखमी तरुणींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोघींची प्रकृती स्थिर आहे, तर इतर दोघी जखमी असून उपचार सुरु आहेत.