मध्य प्रदेशमधील सीहोर जिल्ह्यात मंगळवारी (०६ जून) एक धक्कादायक घटना घडली. येथील एक अवघी अडीच वर्षांची मुलगी बोअरवेलमध्ये पडली आहे. ही बोअरवेल तब्बल ३०० फूट खोल आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा जिल्हा असलेल्या सीहोरमधल्या मुंगावली गावात काल दुपारी १.३० च्या सुमारास ही मुलगी बोअरवेलमध्ये पडली. या मुलीचं नाव सृष्टी असं असून तिच्या वडिलांचं नाव राहुल कुशवाह असं आहे. ही मुलगी सुरुवातीला २९ फूट खाली अडकली होती. परंतु आता ५० फूट खाली गेली आहे. तिला पाईपद्वारे ऑक्सिजन आणि खान्यापिण्याचं साहित्य दिलं जात आहे. ही मुलगी खूप खाली गेल्यामुळे मुख्यमंत्री चौहान यांनी थेट भारतीय सैन्यदलाला पाचारण केलं आहे. तसेच या मुलीला बहेर काढण्यासाठी शक्य ते सगळं करा असे आदेश चौहान यांनी दिले आहेत.
१२ फूट खोदकाम केल्यानंतर पुढे दगडांचा अडथळा आला, त्यामुळे दगड फोडण्यासाठी मशीन्सचा वापर सुरू केला. परंतु मशीन्सच्या कंपनामुळे मुलगी घसरून आणखी खाली जाईल, अशी भिती व्यक्त केली जात आहे. बचाव पथकाने बोअरच्या समांतर २५ फूट खड्डा खोदला आहे. सृष्टीला बहेर काढण्यासाठी स्थानिक पोलीस, प्रशासकीय अधिकारी आणि एनडीआरएफच्या तुकड्या परिश्रम घेत आहेत.




सृष्टीची आई राणी घराच्या अंगणात काम करत होती. तिच्या डोळ्यादेखत सृष्टी खेळत खेळत त्यांचे शेजारी गोपाल यांच्या शेतात गेली. तिथेच ही बोअर आहे. बोअरजवळ बाजरीच्या पेंढ्या होत्या. या पेंढ्यांवरून घसरत सृष्टी बोअरवेलमध्ये पडली. हे पाहून तिची आई बोअरवेलकडे धावली. परंतु तोवर सृष्टी खूप खाली गेली होती.
हे ही वाचा >> “अफझल खान किंवा औरंगजेब, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात कुणीही…”, नगरमधील ‘त्या’ घटनेवरून अजित पवारांचा संताप
एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकं आपल्या परीने बचावकार्य करत आहेत. त्यातच आता मुख्यमंत्र्यांनी भारतीय सैन्याला (Indian Army) पाचारण केलं आहे. कारण बोअरवेलच्या आसपास मशीनद्वारे खोदकाम सुरू आहे आणि या मशीन्सच्या कंपनामुळे मुलगी आणखी खाली जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.