तालिबान्यांनी पाकिस्तानच्या अशांत वायव्य प्रांतातील शियापंथीयांच्या मशिदीवर शुक्रवारच्या प्रार्थनेच्या वेळी केलेल्या हल्ल्यात किमान २० जण ठार, तर ५० जण जखमी झाले. 

अवघ्या पंधरवडय़ात झालेला अशा प्रकारचा हा दुसरा गंभीर दहशतवादी हल्ला असून, तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेने आजच्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
हयाताबाद या उच्चभ्रू भागातील स्थानिक पासपोर्ट केंद्र व फेडरल इन्व्हेस्टिगेशन ऑफिससह अनेक सरकारी इमारतींजवळ असलेल्या इमामिया मशिदीत शियापंथीय लोक मोठय़ा संख्येत शुक्रवार दुपारच्या प्रार्थनेसाठी जमले होते. याच वेळी ग्रेनेड्स आणि कलाश्निकॉव्ह बंदुका घेतलेले ३ आत्मघातकी बॉम्बर्स मशिदीत शिरले. त्यांनी बॉम्बस्फोट केले, तसेच आपल्याजवळील बंदुकांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात २० लोक ठार, तर ५० जण जखमी झाल्याचे इस्पितळाच्या सूत्रांनी सांगितले.
तीन आत्मघातकी बॉम्बर्सपैकी एक जणच त्याच्या अंगावरील बॉम्बचा स्फोट घडवण्यात यशस्वी झाला. दुसऱ्याला सुरक्षा दलांनी ठार केले, तर तिसऱ्याला जखमी अवस्थेत अटक करण्यात आली, असे मियाँ सईद या अधिकाऱ्याने सांगितले. एका आत्मघातकी बॉम्बरचे जॅकेट बॉम्बनाशक पथकाने निकामी केले.
शुक्रवारची प्रार्थना सुरू असताना सैनिकांच्या वेशातील तिघांनी मशिदीत प्रवेश केला आणि त्यांनी या परिसरात नेमलेल्या सुरक्षा रक्षकांवर ग्रेनेड्स फेकले, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. पोलीस आणि लष्करी जवानांनी मशिदीत राबवलेली मोहीम अडीच तास चालली.बरोबर पंधरा दिवसांपूर्वी सिंध प्रांतातील शिया मशिदीत शुक्रवारच्या प्रार्थनेदरम्यान झालेल्या अशाच हल्ल्यात लहान मुलांसह ६१ जण ठार झाले होते. पंतप्रधान नवाझ शरीफ व अध्यक्ष ममनून हुसेन यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.