US Jewellery Theft Viral Video: अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील फ्रेमोंट शहरात भारतीय-अमेरिकन कुटुंबाच्या मालकीच्या ज्वेलरी दुकानावर झालेल्या धाडसी दरोड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने प्रसिद्ध केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही मास्क घातलेले दरोडेखोर ‘कुमार ज्वेलर्स’ या दुकानात घुसून मोठ्या प्रमाणात दागिने लुटताना दिसत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हुडी आणि मास्क घातलेल्या संशयितांचा एक गट दुकानातील काचेच्या शोकेस फोडून दागिने वेगाने बॅगमध्ये भरताना दिसतो. काही क्षणांतच त्यांनी दुकानातील बहुतेक दागिने गोळा केले आणि बाहेर उभ्या असलेल्या वाहनांमध्ये बसून घटनास्थळावरून पसार झाले.

चोरी झालेल्या दागिन्यांची किंमत किती?

ही घटना १८ जून २०२५ रोजी घडली. दरोडेखोरांनी हातोडे आणि इतर साधनांच्या मदतीने काचेचे कप्पे फोडले आणि दुकानातील सुमारे ७५ ते ८० टक्के दागिने लुटले. लुटलेल्या दागिन्यांची अंदाजे किंमत १५ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

घटना कशी घडली?

यूएस अॅटर्नी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, एक राखाडी रंगाची होंडा कार दुकानाच्या समोरच्या काचेत घुसवून जबरदस्तीने प्रवेश करण्यात आला. त्यानंतर एका संशयिताने दुकानातील सुरक्षा रक्षकावर बंदूक रोखली, तर दुसऱ्याने त्याला पकडून जमिनीवर पाडले.

यानंतर डझनभर मुखवटा घातलेल्या व्यक्तींनी दुकानात घुसून हातोड्यांनी काचेचे कप्पे फोडले आणि आत असलेले दागिने लुटले. मिनिटाच्या आत दरोडेखोरांनी मोठ्या प्रमाणात दागिने बॅगमध्ये भरले आणि बाहेर थांबलेल्या वाहनांमध्ये बसून तेथून पळ काढला.

आरोपींना तुरुंगवास आणि अडीच कोटी दंड

या प्रकरणात फेडरल ग्रँड ज्युरीने चार संशयितांवर आरोप ठेवले आहेत. त्यामध्ये सॅन ब्रुनो येथील अफाटुपेतैकी फासिसिला, २० वर्षीय जोस हेरडा-अरागॉन, २० वर्षीय आंद्रेस पॅलेस्टिनो (कॉनकॉर्ड) आणि १९ वर्षीय टॉम पार्कर डोनेगन (फेअरफिल्ड) यांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोषी ठरल्यास प्रत्येक आरोपीला कमाल २० वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि सुमारे २.५ कोटी रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

नेटिझन्स काय म्हणाले?

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक नेटिझन्सनी आश्चर्य व्यक्त केले. काहींनी या दरोडेखोरांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई केल्याचे म्हटले. एका वापरकर्त्याने लिहिले, “किमान २० जणांचा हा गट असावा.” तर दुसऱ्याने टिप्पणी केली, “फक्त एका मिनिटात दुकानातील ७५ टक्के दागिने कसे लुटले?”