scorecardresearch

‘पाकिस्तानचे २०० दहशवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसण्याच्या तयारीत’, उत्तर सैन्यदलाच्या कमांडरचा खळबळजनक दावा

सध्या भारत-पाकिस्तान सीमेवर सुमारे २०० दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचा दावा उत्तर सैन्यदलाचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केला आहे.

(फोटो सौजन्य- पीटीआय)

मागील वर्षभरापासून भारत-पाकिस्तान सीमेवर शांतता आहे. गेल्या वर्षभरात एक ते तीन वेळाच शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. सीमेवर शांतता असली तरी जम्मू-काश्मीर दहशतवादी कारवायांच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. अलीकडेच दक्षिण काश्मीरमधील पहलगामच्या जंगल परिसरात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक घडली आहे. या चकमकीत सुरक्षा दलाने हिज्बुल मुजाहिदीनच्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.

ही घटना ताजी असताना उत्तर सैन्यदलाचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी एक मोठं विधान केलं आहे. सध्या भारत-पाकिस्तान सीमेवर सुमारे २०० दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. कोणत्याही क्षणी ते भारतात प्रवेश करू शकतात, असंही त्यांनी म्हटलं आहे. लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यावेळी शुक्रवारी नॉर्थ टेक चर्चासत्रात सहभाग घेतला होता. यावेळी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना द्विवेदी यांनी हा दावा केला आहे.

पुढे ते म्हणाले की, गेल्या वर्षभरात भारत-पाक सीमेवर शांतता आहे. शस्त्रसंधीच्या खूपच कमी घटना घडल्या असून हा आकडा एक ते तीन इतकाच आहे. असं असलं तरी गेल्या वर्षभरात २१ विदेशी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं नसलं तरी, सीमेपलीकडे दहशतवाद्यांना पोसलं जात आहे. पाकिस्तानच्या हद्दीत सहा मोठे दहशतवादी तळ आणि २९ लहान छावण्या आहेत. सध्याच्या घडीला सीमेपलीकडे २०० दहशतवादी जम्मू काश्मीरमध्ये घुसण्याच्या तयारीत आहेत.

दुसरीकडे, हरियाणा पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी कर्नालमध्ये चार संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. अटक केलेल्या संशयितांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहेत. संबंधित दहशतवादी मोठा घातपात घडवून आणण्याच्या तयारीत होते, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. या घटनेचा सविस्तर तपास हरियाणा पोलीस करत आहेत. दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये गोळ्या आणि गनपावडर कंटेनरचा समावेश आहे. गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास चारही जणांना बस्तारा टोल प्लाझाजवळून अटक करण्यात आली. सर्वजण मोठ्या एसयूव्हीमधून जात होते. हे सर्वजण पंजाबहून दिल्लीला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आली आहे. आयबीच्या अहवालाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 200 pakistani terrorists ready to enter in jammu and kashmir claim northern army commander rmm

ताज्या बातम्या