खरगोन मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात नर्मदा नदीकिनारी विषबाधेमुळे कमीत कमी २०० पोपटांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार दिवसांत बडवाह भागात नर्मदा नदीवरील पुलावर हे पोपट मृतावस्थेत आढळले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात बर्ड फ्लूमुळे या पोपटांचा मृत्यू झाला नसून विषबाधेने झाला असल्याचे पशुवैद्यक डॉ. मनीषा चौहान यांनी सांगितले.
जिल्हा वन्यजीव अधिकारी टोनी शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव कार्यादरम्यान काही पोपट जिवंत आढळले होते; परंतु विषबाधेचे प्रमाण अधिक असल्याने काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली, तथापि तपासात संक्रमणाची लक्षणे आढळली नाहीत. या घटनेनंतर वन विभागाने पुलाजवळ पक्षुपक्ष्यांना खाद्यान्न देण्यावर बंदी घातली असून देखरेख ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसेच मृत पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी जबलपूरला पाठविले आहेत.
