गोध्रा जळीतकांडाप्रकरणी अहमदाबादमधील विशेष न्यायालयाने याकूब पटालियाला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने या प्रकरणात अन्य तीन जणांना दोषमुक्त केले आहे.

गोध्रा येथे २७ फेब्रुवारी २००२ रोजी साबरमती एक्स्प्रेसच्या एस-६ डब्याला आग लावली होती. या डब्यातील बहुसंख्य प्रवासी हे कारसेवक होते. ५९ प्रवाशांचा या घटनेत मृत्यू झाला होता. गोध्रा येथील जळीतकांड हे गुजरातमधील दंगलीसाठी कारणीभूत ठरले होते. याप्रकरणी विशेष न्यायालयात सुनावणी सुरु आहे. बुधवारी न्यायालयाने या प्रकरणात याकूब पटालियाला दोषी ठरवत त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. साबरमती एक्स्प्रेसच्या डब्याला आग लावणाऱ्या जमावात याकूब देखील सामील होता.

यापूर्वी ऑगस्ट २०१८ मध्येही विशेष न्यायालयाने गोध्रा ट्रेन हत्याकांडप्रकरणी दोन जणांना दोषी ठरवले होते. तर तीन जणांना दोषमुक्त केले होते. दोषी ठरलेल्या दोघांना जन्पठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर गुजरात हायकोर्टाने याआधी २०१७ मध्ये ११ जणांच्या मृत्यूदंडाची शिक्षा कमी करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तसेच अन्य २० जणांची जन्मठेप कायम ठेवताना ६३ जणांची सुटका करण्याचा निर्णयही कायम ठेवला होता.