२००२च्या गुजरात दंगल प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्यासह तिघांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. गुजरात पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) हे दोषारोपपत्र दाखल केलं असून तिस्ता सेटलवाड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. गुजरात सरकारची बदनामी करण्याचा कट आखल्याचा आणि तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सेटलवाड यांच्यासह गुजरातचे निवृत्त पोलीस महासंचालक आर. बी. श्रीकुमार आणि माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आलं आहे. त्यांच्याविरोधात १०० पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. २००२ च्या गुजरात दंगल प्रकरणात बनावट पुरावे तयार केल्याचा आरोप यात करण्यात आला आहे.

विशेष तपास पथकाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी कट आखला होता. सरकारचा भाग असतानाही आर. बी. श्रीकुमार आणि संजीव भट्ट यांनी तिस्ता यांच्यासाठी खोटी कागदपत्रं तयार केली आणि नंतर त्यांचा अधिकृत कागदपत्रांमध्ये समावेश केला.

तिस्ता सेटलवाड यांच्यासह तिघांवर दोषारोपपत्र ; गुजरात दंगलीप्रकरणी बनावट पुरावे तयार केल्याचा ठपका

दोषारोपपत्रातील दाव्यानुसार, आरोपींना नरेंद्र मोदींची राजकीय कारकीर्द संपवायची होती आणि त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवायचा होता. खोटी कागदपत्रं आणि प्रतिज्ञापत्र तयार करण्यासाठी वकिलांची एक फौजच त्यांनी तयार केली होती.

दंगलीतील पीडितांची फसवणूक करत जबरदस्तीने खोट्या कागदपत्रांवर स्वाक्षरी घेण्यात आल्या. कागदपत्रं इंग्रजीत असल्याने पीडितांना आपण कोणत्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करत आहोत याची कल्पना नव्हती असा एसआयटीचा दावा आहे. तिस्ता सेटलवाड यांनी पीडितांना मदत न केल्यास परिमाण भोगावे लागतील अशी धमकीही दिली होती असा आरोप एसआयटीने केला आहे.

गोध्रा कारागृहातून सुटल्यानंतरचे आरोपींचे वर्तन अत्यंत घृणास्पद – न्या. यू. डी. साळवी

सहआरोपी असणारे आयपीएस अधिकारी तिस्ता सेटलवाड यांना मदत करत होते. आर बी श्रीकुमार यांनी तर एका साक्षीदारालाही धमकावलं होतं असा एसआयटीचा दावा आहे. “जर तुम्ही तिस्ता सेटलवाड यांना मदत केली नाही, तर मुस्लीम तुमच्याविरोधात उभे राहतील आणि दहशतवादी तुम्हाला लक्ष्य करतील. जर आपण आपापसात भांडत राहिलो, तर शत्रूला आणि मोदींना याचा फायदा होईल,” असं श्रीकुमार यांनी एका साक्षीदाराला सांगितल्याचा उल्लेख दोषारोपपत्रात आहे.

आरोपींनी पीडितांना गुजरातच्या बाहेर नेलं आणि त्यांच्या नावे कोट्यावधींची देणगी गोळा केली असाही आरोप आहे. एसआयटीच्या म्हणण्यानुसार, तिस्ता सेटलवाड यांनी काँग्रेसच्या अनेक नेत्यांसह दंगलग्रस्तांसाठी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरांमध्ये जाऊन त्यांना गुजरातमध्ये न्याय मिळणार नाही, अशी दिशाभूल केली. पीडितांना त्यांचे खटले राज्याबाहेरील कोर्टात नेण्यासाठी त्यांनी हेराफेरी केली आणि यासाठी कागदपत्रे दाखल करायला लावली, असाही दावा आहे.

तिस्ता सेटलवाड या सतत संजीव भट्ट यांच्या संपर्कात होत्या, जे नेहमी पत्रकार, स्वयंसेवी संस्था आणि विरोधी नेते यांच्याशी ई-मेलच्या माध्यमातून संपर्कात होते. एसआयटीच्या दाव्यानुसार, ते अॅमिकस क्युरी, न्यायालय आणि प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते.

इतकंच नाही तर माजी आयपीएस अधिकाऱ्याने तिस्ता सेटलवाड यांनी तयार केलेल्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार देणाऱ्या एका पीडिताचं अपहरण केलं आणि जबरदस्तीने स्वाक्षरी करण्यास भाग पाडलं.

जून महिन्यात अटक झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये सेटलवाड यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. श्रीकुमार आणि भट्ट हे अन्य दोन आरोपी कोठडीत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2002 gujarat riots sit alleges teesta setalvad plotted for death sentence to narendra modi in chargesheet sgy
First published on: 22-09-2022 at 08:13 IST