अजमेर दर्गामधील स्फोटाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने भावेश पटेल आणि देवेंद्र गुप्ता या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सुनील जोशी हा या प्रकरणातील तिसरा दोषी होता. पण २०१४ मध्ये सुनील जोशीचे निधन झाले होते.

अजमेरमधील सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या दर्गामध्ये ऑक्टोबर २००७ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात तीन जण ठार तर ३० जण जखमी झाले होते. सुरूवातीला राजस्थान एटीएसने तपास सुरू केला होता. २० ऑक्टोबर २०१० रोजी अजमेर न्यायालयात तीन आरोपींच्या विरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते. पण १ एप्रिल २०११ रोजी एनआयएकडे तपास सोपवण्यात आला. एनआयएने या खटल्यात १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. यात एनआयएने स्वामी असीमानंद, देवेंद्र गुप्ता, चंद्रशेखर लेवे, लोकेश शर्मा, मुकेश वासानी, हर्षद भारत मोहनलाल रतिश्वर, संदीप डांगे, रामचंद्र, भावेश भाई पटेल, सुरेश नायर आणि मेहुल यांना आरोपी बनवले होते.

८ मार्चरोजी एनआयएच्या विशेष न्यायालयाने याप्रकरणातील पाच जणांना दोषमुक्त केले होते. तर भावेश पटेल, देवेंद्र गुप्ताला दोषी ठरवले होते. या दोघांच्या शिक्षेवर बुधवारी न्यायालयाने निकाल दिला आहे. या दोघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या खटल्याच्या सुनावणीत १४९ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. ४५१ कागदपत्र या खटल्यात पुरावे म्हणून सादर करण्यात आली. याशिवाय तपास यंत्रणेने तीन वेळा पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते.

स्वामी असीमानंद यांची निर्दोष सुटका झाल्याने एनआयएच्या तपासावर प्रश्न उपस्थित होत आहे. अजमेर बॉम्बस्फोटप्रकरणी स्वामी असीमानंद यांनी कबुलीजबाब दिलेला असूनही न्यायालयाने त्यांची सुटका कशी केली हे समजत नाही असे सरकारी वकिलांनी म्हटले होते. या खटल्यातील १४९ पैकी २६ साक्षीदार उलटले. त्यातील कित्येकांनी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबानी दिली होती. नंतर त्यांनी ती नाकारली. असीमानंद यांनीही आपण दबावाखाली कबुली दिल्याचे न्यायालयास सांगितले. असे असले तरी पुराव्यांअभावी त्यांची सुटका करण्यात आली आहे. पुरावे सादर करण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणा कमी पडली असा आरोपही केला जात आहे.