बगदादच्या आग्नेय भागात शनिवारी झालेल्या कारबॉम्ब हल्ल्यात किमान २१ जण ठार झाले, तर किमान ४२ जण जखमी झाले. घटनास्थळी असलेल्या स्थानिक पोलिसांच्या सांगण्यानुसार, बगदादमधील पवित्र काधिमिया दग्र्याकडे जात असलेले शिया यात्रेकरू हे या हल्ल्याचे लक्ष्य होते. मात्र एका खुल्या बाजाराला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आल्याचे इराकी सुरक्षा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ही परस्पर विसंगत वक्तव्ये लगेच पडताळून पाहता आली नाहीत.
आठव्या शतकातील इमाम मूसा अल-काधिम यांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी संपूर्ण इराकमधून हजारो शिया भाविक त्यांच्या दग्र्याचे दर्शन घेण्यासाठी पायी जातील अशी अपेक्षा आहे.या हल्ल्याची जबाबदारी तत्काळ कुणी स्वीकारलेली नसली, तरी शिया यात्रेकरू आणि बगदादनजिकच्या शियाबहुल भागातील नागरिक यांना लक्ष्य करून अशाप्रकारचे अनेक हल्ले केल्याचा आयसिसने दावा केला आहे. शिया लोक हे धर्मभ्रष्ट असून त्यांना मृत्युदंडच द्यायला हवा असे आयसिसचे मत आहे. इराकमधील भ्रष्टाचार आणि उधळपट्टी यांना आळा घालण्यात अपयश आल्याबद्दल पंतप्रधान हैदर अल-अबादी यांच्यावर वाढता दबाव असल्यामुळे उद्भवलेल्या राजकीय संकटाच्या काळातच हा मोठा हल्ला झाला आहे.