२१ वर्षीय मॉडेल मुस्कानची तिच्या घरी हत्या करण्यात आली. या प्रकरणात तिचा जिम ट्रेनर हा आरोपी असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. बुधवारी दिल्लीतल्या टिळक नगर या भागातील एका इमारतीत ही घटना घडली. मुस्कान ज्या घरात वास्तव्य करत होती तिथेच तिची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. इम्रान असं जिम ट्रेनरचं नाव आहे. त्याने तिच्यावर चाकूचे वार केले, तिला भोसकलं आणि तिची हत्या केली. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

नेमकी घटना काय घडली?

मुस्कान नावाची २१ वर्षीय मॉडेल दिल्लीतल्या पश्चिम भागात असलेल्या टिळक नगरमध्ये एका इमारतीत राहात होती. तिच्या घरी जाऊन जिम ट्रेन इम्रानने तिच्यावर चाकूचे वार केले आणि तिची हत्या केली. त्यानंतर त्याने घटनास्थळावरुन पळ काढला. इम्रान पळ काढतानाचं सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागलं आहे. पोलीस आता या प्रकरणात इम्रानचा शोध घेत आहेत. NDTV ने हे वृत्त दिलं आहे. मुस्कान ही मॉडेल होती आणि विद्यार्थिनीही होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुस्कानच्या किंकाळ्या ऐकून शेजाऱ्यांनी घेतली धाव

मुस्कानच्या किंकाळ्या ऐकून शेजाऱ्यांनी तिच्या घराकडे धाव घेतली, तेव्हा त्यांना ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यानंतर त्यांनी मुस्कानला रुग्णालयात नेलं, मात्र तिथे उपचारादरम्यान मुस्कानचा मृत्यू झाला. आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस उपायुक्त (डीसीपी) अभिषेक गुप्ता यांनी दिली. तपास अधिकारी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत, असेही त्यांनी सांगितलं.

मुस्कानच्या बहिणीचा फोन आला आणि….

मुस्कानचा मित्र अमन याने अशी माहिती दिली की मुस्कान ही तिच्या तीन बहिणींपैकी लहान बहीण होती. तिच्या मोठ्या बहिणीने मला फोन केला होता तिने मला हे सांगितलं की ती चंदीगढ या ठिकाणी आहे. तू तातडीने मुस्कानच्या घरी जा, तिच्यावर कुणीतरी चाकूचे वार केले आहेत. अशी माहिती अमनने पत्रकारांना दिली. मी लगेच माझ्या एका मित्राला फोन केला आणि त्याला मुस्कानच्या घरी पोहचून रुग्णालयात नेण्यास सांगितलं. मी तिथे पोहचेपर्यंत अँब्युलन्स आली होती अशी माहिती अमनने दिली.

इम्रान मुस्कानचा छळ करत होता?

अमनने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार इम्रान हा जिम ट्रेनर मुस्कानचा छळ करत होता. त्याने यापूर्वीही तिला मारहाण केली होती. तसंच इम्रान हा माझा छळ करतो हे मुस्कानने तिच्या बहिणींना सांगितलं होतं असंही अमनने सांगितलं. पोलीस या प्रकरणात आता फरार इम्रानचा शोध घेत आहेत.