लखनौ/उन्नाव : उत्तर प्रदेशमध्ये शुक्रवारी मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी भिंत कोसळून २२ जण मृत्युमुखी पडले. या मृतांत लखनौमधील नऊ मजुरांचा समावेश आहे. हे मजूर भिंत कोसळून त्याखाली गाडले गेले. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत जाहीर केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनांबद्दल दु:ख व्यक्त केले.

हेही वाचा >>> : आता आईच्या गुन्ह्यातून नवजात बालकांची सुटका; कारागृहामध्ये जन्माला आलेल्या बालकांच्या जन्म दाखल्यावर शहराच्या नावाची नोंद

लखनौमध्ये, रात्रभर पडलेल्या पावसामुळे लष्करी परिसराची बांधकाम सुरू असलेली सीमा भिंत कोसळली, त्यात हे नऊ मजूर मृत्युमुखी आणि एक जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस सहआयुक्त पियुश मोर्दिया यांनी सांगितले, की काही मजूर दिलकुशा भागातील लष्करी भागाजवळ झोपडय़ांत राहत होते. गुरुवारी रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे येथे बांधकाम सुरू असलेली सीमा भिंत कोसळली. ढिगाऱ्याखालून नऊ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. उन्नाव जिल्ह्यात कंठा आणि चांदपूर झलिहाई गावात भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन मुलांसह चार जणांचा मृत्यू झाला. कांथा येथे अंकित (२०), अंकुश (४) आणि उन्नती (६) या तीन भावंडांचा रात्रभर पडलेल्या पावसामुळे त्यांच्या घराची भिंत कोसळल्याने मृत्यू झाला, असे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी नरेंद्र सिंह यांनी सांगितले. ही घटना पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान घडली. पावसामुळे त्यांच्या घराच्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी मृतांचे पालक बाहेर असताना या घराची भिंत कोसळली. अशाच एका घटनेत चंदपूर झलिहाई गावात ६६ वर्षीय बाल गोविंद यांचा मृत्यू झाला, असेही सिंग यांनी सांगितले. या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री कार्यालयाने केलेल्या ‘ट्वीट’मध्ये नमूद केले, की मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. या ‘ट्वीट’नुसार योगींनी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. जखमींवर उपचार करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनास दिले आहेत.