scorecardresearch

बंगाल हिंसाचारप्रकरणी २२ अटकेत ; १० घरांवर पेट्रोल बॉम्बच्या सहा्य्याने हल्ला; आठ जणांचा मृत्यू

या घटनेच्या तपासाकरता पश्चिम बंगाल सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे

कोलकाता/ रामपूरहाट : पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात आठ जणांचे बळी घेणाऱ्या हिंसाचाराच्या संबंधात किमान २२ लोकांना अटक करण्यात आली असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.

 तृणमूल काँग्रेसचा पंचायत नेता भदू शेख याच्या सोमवारी झालेल्या हत्येनंतर रामपूरहाट शहराच्या सीमेवरील बोगतुई खेडय़ातील जवळपास १० घरांवर पेट्रोल बॉम्बच्या साहाय्याने हल्ला करण्यात आला होता. अटक करण्यात आलेल्यांमध्ये शेख याच्या मुलांचा समावेश असल्याचा दावा शेख कुटुंबीयांनी केला. तथापि, अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे पोलिसांनी अद्याप जाहीर केलेली नाहीत.

 बोगतुई खेडय़ातील सुमारे डझनभर घरे मंगळवारी पहाटे पेट्रोल बॉम्ब फेकून पेटवून देण्यात आल्यानतंर २ मुलांसह सर्व आठहीजण जळून मरण पावले होते. या घटनेतील सहभागाबद्दल ११ लोकांनी त्याच दिवशी अटक करण्यात आली होती.

 ‘या घनटेत आणखी लोक सहभागी होते काय हे शोधण्यासाठी आम्ही त्यांची चौकशी करत आहोत. काही आरोपी खेडय़ातून पळून गेले असल्याचे दिसते. आम्ही त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहोत’, असे हा अधिकारी म्हणाला. ‘अपघाताच्या स्वरूपाची’ कल्पना येण्यासाठी न्यायवैद्यकतज्ज्ञ उद्ध्वस्त घरांची तपासणी करत असल्याचेही त्याने सांगितले.

 या घटनेच्या तपासाकरता पश्चिम बंगाल सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य सरकारकडून या घटनेबाबत सविस्तर अहवाल मागवला आहे.

डाव्या आघाडीचा मोर्चा

 दरम्यान, डाव्या आघाडीने रामपूरहाट शहरात बुधवारी मोर्चा काढला आणि आदल्या दिवशी हिंसाचारात मरण पावलेल्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली. ही ‘सामूहिक हत्या’ दडपून टाकण्याच्या कुठल्याही प्रयत्नाला विरोध केला जाईल, असे माकपचे राज्य सचिव मोहम्मद सलीम यांच्यासोबत मोर्चाचे नेतृत्व करणारे डाव्या आघाडीचे अध्यक्ष विमान बोस यांनी केली. संकटात सापडलेल्या गावकऱ्यांच्या सुटकेसाठी पोलिसांनी काहीच हालचाल न केल्याचा, तसेच या हल्ल्यांमध्ये वाळू माफियांनी भूमिका बजावल्याचा आरोप त्यांनी केला.

हिंसाचाराच्या सूत्रधारांविरुद्ध कठोर कारवाई

कोलकाता : प. बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराच्या सूत्रधारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी सांगितले.

 ज्या ठिकाणची घरे पेटवून देण्यात आली, त्या बोगतुई खेडय़ाला आपण गुरुवारी भेट देणार असून परिस्थितीचा आढावा घेणार आहोत, असे बॅनर्जी म्हणाल्या.

या घटनेचे वर्णन ‘दुर्दैवी’ असे करून बॅनर्जी म्हणाल्या, की भाजप, डावे पक्ष आणि काँग्रेस यांचा आमच्या सरकारची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न आहे. या घटनेत गुंतलेले लोक कोणत्याही राजकीय पक्षाचे असोत, त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. प्रभारी पोलीस निरीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना यापूर्वीच हटवण्यात आले असून, पोलीस महासंचालक मंगळवारपासून जिल्ह्यात तळ ठोकून आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली. घटना घडलेल्या ठिकाणी भेटीसाठी गेलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांशी संघर्ष टाळण्यासाठी आपण तेथील भेट एक दिवसाने लांबणीवर टाकली, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पंतप्रधानांकडून हिंसाचाराचा तीव्र निषेध

कोलकाता :  पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या हत्या ‘नृशंस’ असल्याचे वर्णन करतानाच, दोषींना क्षमा केली जाऊ नये, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले. या घटनेतील सूत्रधारांना शिक्षा करण्यासाठी राज्याला जी काही मदत आवश्यक असेल ती करण्यास केंद्र तयार आहे, असे कोलकात्यातील व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांना समर्पित एका प्रेक्षक दीर्घेचे (गॅलरी) उद्घाटन करण्याच्या आभासी कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले.‘बीरभूम जिल्ह्यातील हिंसक घटनेत बळी पडलेल्यांबाबत मी शोकसंवेदना व्यक्त करतो. अशा प्रकारचे निंद्य गुन्हे करणाऱ्यांना शिक्षा मिळेल याची राज्य सरकार नक्कीच पावले उचलेल अशी मला आशा आहे’ असे मोदी यांनी सांगितले.अशा घटनांमागील सूत्रधारांना, तसेच अशा गुन्हेगारांना प्रोत्साहन देणाऱ्यांना कधीही माफ करू नका असे आवाहन मी बंगालच्या लोकांना करतो, असे पंतप्रधान म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 22 people arrested in birbhum violence case zws

ताज्या बातम्या