2-year-old committing suicide on Instagram Live : तरुणांच्या आत्महत्येचे प्रकार दिवसेंदिवस वाढत जात असून ऑनलाईन लाईव्ह स्ट्रिमिंग करून आत्महत्या करण्याचेही प्रकार वाढत आहेत. मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात एका २२ वर्षीय तरुणाने इंस्टाग्रामवर लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यान आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. देहात पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (२७ मार्च) रात्री ही घटना समोर आली. मनोज रजक असे या तरुणाचे नाव असून त्याच्या शेवटच्या क्षणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे.टाईम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी काय सांगितलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाईव्ह स्ट्रिमिंगदरम्यान त्याने स्वतःला पंख्याला गळपास लावला होता. शेवटच्या क्षणी त्याने ऑनलाईन असलेल्या मित्रांसमोर हात हलवला तसंच, फ्लाइंग किसही केलं. तो जवळपास १४ मिनिटे लाईव्ह होता. मे अधुरा जी रहा हू हे गाणं तो ऐकत होता. सुरुवातीला त्याने कपड्यांच्या स्टॅण्डवरून पंख्याला लटकण्याचा प्रयत्न केला. परंतु, पहिला प्रयत्न त्याचा फसला. त्यामुळे तो खाली, त्याने आपल्या मोबाईलचा अँगल व्यवस्थित केला. लाईव्ह सेशनमध्ये आलेले कॉमेंट्स त्याने वाचले. सर्व मित्रांना त्याने गुडबाय केलं. फ्लाईंग किसही दिलं. हा सर्व प्रकार लाईव्ह व्हिडिओमध्ये कैद झाला. त्यामुळे तो लाईव्ह असताना जे ऑनलाईन होते, त्यांनी त्याच्या आयुष्याचा शेवटचा क्षण पाहिला. पण त्याच्यापर्यंत पोहोचण्यास असमर्थ ठरले. त्याचे काही मित्र तत्काळ त्याच्या खोलीवर गेले. परंतु, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज हा एकटाच भाड्याच्या खोलीत राहत होता आणि प्लंबर म्हणून काम करत असे. त्याच्या आईचं निधन झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. तो प्लंबरच्या कामाबरोबरच घरातूनच कपडे विकण्याचाही व्यवसाय करत होता. त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, पोलीस तपासात त्याच्या खोलीत सुसाईड नोट आढळून आली नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृतदेह कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आला.