कॅनडामध्ये एका भारतीय विद्यार्थिनीची हत्या झाली आहे. विधी कल्पेशभाई मेघानी असं हत्या झालेल्या मुलीचं नाव आहे, ती मूळची गुजरातमधल्या आणंदमधल्या बोरसदची होती. विधी कॅनडातल्या नियाग्रा भागात राहात होती. निधी कॅनडामध्ये शिक्षण घेत होती आणि नोकरीही करत होती. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आणि तपास सुरु केला आहे.
नेमकी काय घटना घडली?
समोर आलेल्या माहितीनुसार कॅनडामध्ये विधीची चाकूचे वार करुन हत्या करण्यात आली. विधीची हत्या का करण्यात आली? याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. विधीच्या हत्येची बातमी समोर आल्यानंतर मेघानी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. १५ मे रोजी विधी मेघानी तिच्या नियाग्रातल्या तिच्या घरातून बाहेर पडली. त्यावेळी तिच्यावर चाकू हल्ला करण्यात आला. विधी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, तिला रुग्णालयात नेण्यात आलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या प्रकरणी कॅनडा पोलीस आता विधीच्या हत्येचा तपास करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे. कॅनडातील पोलीस आता या आरोपीची चौकशी करत आहेत. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
कॅनडात सातत्याने भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले
कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर हल्ले होणं त्यांची हत्या होणं हे प्रकार सुरुच आहेत हे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात ३० वर्षीय हिमांशी खुरानाची हत्या करण्यात आली. एप्रिल २०२५ मध्ये ओंटियारोमध्ये मूळ पंजाबची असलेली २१ वर्षीय विद्यार्थिनी हरसिमकर रंधावाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी ३२ वर्षीय आरोपीला अटक केली.
विधी मेघानीच्या हत्येबाबत काय माहिती समोर आली आहे?
गुजरातच्या तरुणीची कॅनडामध्ये हत्या, विधी मेघानी असं मृत मुलीचं नाव आहे. ती २२ वर्षांची होती.
विधी मूळची गुजरातच्या आणंदमधली होती.
विधी मागच्या चार वर्षांपासून कॅनडातल्या नियाग्रामध्ये वास्तव्य करत होती.
१५ मे रोजी विधी घराबाहेर पडली तेव्हा रस्त्यावर लुटीच्या उद्देशाने तिच्यावर चाकू हल्ला केला आणि तिच्यावर वार केले.
विधी नियाग्रामध्ये शिक्षण घेत होती आणि नोकरीही करत होती. तसंच ही तरुणी पीआर अर्थात Permanent Residency साठीही तयारी करत होती.
विधीच्या मृत्यूच्या बातमीनंतर मेघानी कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
