२२ वर्षांपासून मदतीची फक्त आश्वासनं देत आहात त्यापेक्षा माझ्या मुलाची शौर्य चक्रं परत घ्या आणि त्याला दिलेली रक्कमही परत घ्या असं म्हणत एका आईने मुख्यमंत्री आणि राष्ट्रपतींकडे दाद मागितली आहे. ही घटना आहे लखनऊमधली. कारण सावित्री सक्सेना या ८० वर्षीय महिलेने आता शहीद सैनिक मुलगा विवेक सक्सेना याच्या मृत्यूला २२ वर्षे उलटूनही मदत न मिळाल्याने हे आवाहन केलं आहे. मी आता सरकारी कार्यालयांचे खेटे मारुन दमले आहे त्यामुळे माझ्या मुलाला मिळालेली शौर्य पदकं आणि त्याला मिळालेला सन्मान निधी परत घ्या असं सावित्री सक्सेना यांनी म्हटलं आहे.

सावित्री सक्सेना यांनी काय म्हटलंय?

सावित्री सक्सेना म्हणाल्या, माझा मुलगा सहाय्यक कमांडेट विवेक सक्सेना हा मणिपूरमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना शहीद झाला. त्याच्या मृत्यूनंतर सरकारने जमीन देण्याचं आणि इतर सुविधा दिल्या जातील असं आश्वासन दिलं होतं. मी २२ वर्षे सरकारी कार्यालयांचे खेटे मारून दमले आहे. त्यामुळे मी सरकारला आता विनंती करते आहे आणि राष्ट्रपतींनाही विनंती करते आहे की माझ्या मुलाला मिळालेली शौर्य पदकं, राष्ट्रपती पदक आणि सन्मान निधी सगळं परत घ्या. माझा मुलगा दहशतवाद्यांशी दोन हात करताना गेला. मात्र त्याच्या मृत्यूला २२ वर्षे उलटूनही आम्ही अजून मदतीच्या प्रतीक्षेत आहोत. मला आणि माझ्या कुटुंबाला अपमान आणि अवहेलनाच सहन करावी लागते आहे. मग जी मदत जाहीर झाली होती त्याला काय अर्थ उरतो का? असा प्रश्नही सावित्री सक्सेना यांनी विचारला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे. सावित्री सक्सेना या त्यांचा मोठा मुलगा रंजीत सक्सेना यांच्यासह तहसील कार्यालयात गेल्या होत्या. तिथे त्यांनी अधिकाऱ्यांना जे काही आश्वासन देण्यात आलं होतं ते दाखवलं आणि ही मदत मिळावी अशी विनंती केली.

जानेवारी २००३ मध्ये शहीद झाले विवेक सक्सेना

कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार ८ जानेवारी २००३ ला दहशतवाद्यांशी दोन हात करताना विवेक सक्सेना यांचा मृत्यू झाला. ते देशासाठी शहीद झाले. ज्यानंतर त्यांना मरणोत्तर राष्ट्रपती पोलीस पदक आणि शौर्य चक्र देऊन गौरवण्यात आलं. मात्र त्यांचं कुटुंब अजूनही म्हणजेच मागील २२ वर्षांपासून मदतीच्या प्रतीक्षेत आहे. विवेक सक्सेना यांचं कुटुंब मागील अनेक वर्षांपासून लखनऊतल्या सरोजिनीनगर भागात राहतं आहे.

रंजीत सक्सेना यांनी काय म्हटलं आहे?

रंजीत सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार विवेक सक्सेना देशासाठी शहीद झाल्यानंतर सरकारने जमीन अधिग्रहण करुन विवेक सक्सेना यांच्या आठवणीत एक स्मृती पार्क उभारलं जाईल अशी घोषणा केली होती. मात्र २२ वर्षांपासून जमीन अधिग्रहीत झालीच नाही. आम्ही यासाठी पाठपुरावा करण्याचं काम केलं. पण माझी आई ८० वर्षांची आहे ती आता सरकारी कार्यालयाचे खेटे मारुन दमली आहे. त्यामुळे आम्ही आहेत ती पदकं आणि सन्मान रक्कमही सरकारला द्यायला तयार आहोत असं रंजीत सक्सेना म्हणाले.